भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार
केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग हे स्थलांतर मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार आहेत. युक्रेनमधील परिस्थितीदरम्यान एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे.
नवी दिल्लीः रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान केंद्र सरकार युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तसेच सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक झाली. काही केंद्रीय मंत्र्यांना भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी समन्वय साधण्यासाठी युक्रेनच्या शेजारी देशांत पाठवणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट करत खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्यानं हे सांगितलं आहे.
केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग हे स्थलांतर मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार आहेत. युक्रेनमधील परिस्थितीदरम्यान एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे. ट्विटरवर हे व्हिडीओ शेअर करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांकडून बाहेर काढण्याची तपशीलवार योजना ताबडतोब सांगावी. आम्ही आमच्या लोकांना असे वाऱ्यावर सोडू शकत नाही.”
विशेष म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणले जात आहे. गुजरातमधील सुमारे 100 विद्यार्थी सोमवारी सकाळी गांधीनगरला पोहोचले. सीएम भूपेंद्र पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. हे विद्यार्थी युक्रेनमधून मुंबई आणि दिल्लीत उतरले आणि त्यांना व्होल्वो बसने गुजरातला आणले. युक्रेनमधून दिल्लीत आलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, सरकारने आम्हाला खूप मदत केली. भारतीय दूतावासाकडून शक्य ती सर्व मदत करण्यात आली. सर्वात मोठी समस्या म्हणजे सीमा ओलांडणे. मला आशा आहे की, सर्व भारतीयांना परत आणले जाईल. अजून अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकलेत.