
बेळगाव : आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा कुली कामगार संघटनेच्या वतीने आज बेळगावात निषेध मोर्चा काढून जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कामगार मोर्चात सहभागी झाले होते. डोक्यावर टोपल्या, कुदळ, खुरपीसारखी मजुरीची अवजारे आणि थाळ्या वाजवत श्रमिकांनी मानधनात वाढ करावी, नरेगा योजनेत किमान 200 दिवस काम द्यावे, उपकरणांच्या भाड्यात वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी भव्य निषेध मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी राणी चन्नम्मा सर्कलमध्ये काहीकाळ रास्ता रोको केला. त्यानंतर तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करत निषेध मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यावर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना निदर्शक मजुरांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील जे मजूर रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करत आहेत, त्यांचा या आंदोलनात सहभाग आहे. आम्हाला 200 दिवस काम द्यावे, वाढीव वेतन देण्यात यावे. कायद्यानुसार मजुरीचे पैसे कामाच्या 15 दिवसांच्या आत अदा करणे आवश्यक आहे. अलीकडे दोन महिन्यातून एकदा वेतन दिले जात आहे. सरकारने 3 महिन्यांपासून उपकरणांचे भाडे देणे थांबवले आहे. ते पुन्हा सुरू करून प्रतिदिन 25 रुपये करण्याची मागणी केली. या संदर्भात सरकारने बजेटमध्येही वाढ करावी. कधीकधी ते योग्यरित्या कार्य करत नाही. त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. आमच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधून आलेले मजूर, त्यांचे नेते व इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta