बेळगाव : तालुक्यात सध्या झाडे लावण्यासाठी उद्योग खात्री योजना पर्याय ठरत आहे. आता विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत असून तालुक्यात उद्योग खात्री योजनेतून 1 लाख 25 हजार 400 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सध्या या कामाला गती मिळाली असून तालुका पंचायत व वनविभाग सक्षमपणे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. बेळगाव तालुक्मयात विविध झाडांच्या रोपट्यांची लागवड केली आहे. मार्कंडेय नदीच्या काठावर काही रोपट्यांची लागवड केली आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीतील पाणीसाठा वाढून शेतीसाठी उपयोग करण्यात येणार आहे. हे कामही उद्योग खात्री योजनेतून केले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या शेजारीही वृक्ष लागवडीचे काम करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यात उद्योग खात्री योजनेतून सुमारे 1 लाख 25 हजार रोपट्यांची लागवड करण्याचा वनविभागाचा उद्देश आहे. त्यापैकी काही रोप लागवड करण्यात आली आहे. उर्वरित झाडे लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
रस्त्याशेजारीही उद्योग खात्री योजनेतून सुमारे 20 हजारांहून अधिक रोपट्यांची लागवड करण्यात आली. कडोली, केदनूर, काकती, के. के. कोप्प, होनगासह इतर ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवर ही रोप लागवड करण्यात आली आहे. आता ही झाडे जगविण्यासाठी शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या रस्त्याच्या शेजारी फणस, जांभुळ व इतर वनौषधी रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी ही झाडे लावली जातात. मात्र, त्यांची योग्य देखभाल होत नसल्याने ती वाया जात आहेत. दरम्यान, त्यांना पाणी व खत दिल्यास या झाडांना फायदा होणार आहे. दरम्यान, तालुक्यात आणखी कोणाला काजू अथवा इतर रोपांची गरज असल्यास वनखात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta