Sunday , December 7 2025
Breaking News

क्रांतिकारी विचारांचा लोकनेता हरपला; विविध संघटनांतर्फे कॉ. कृष्णा मेणसे यांना श्रद्धांजली

Spread the love

 

बेळगाव : स्वातंत्र्यलढा, सीमालढा, गोवा स्वातंत्र्यमुक्ती लढ्यातील झुंजार सेनानी, दलित, श्रमिक, कामकरी, कष्टकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा नेता, साहित्यिक, पत्रकार, कुस्तीपटू, खेळाडू असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून कॉ. कृष्णा मेणसे यांचे कार्य अतुलनीय स्वरुपाचे होते. त्यांच्या निधनाने क्रांतिकारी विचारांचा लोकनेता हरपला असून आप्पांच्या विचारांची जोपासना करणे हीच खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात कॉ. कृष्णा मेणसे यांना आदरांजली वाहण्यात आली.

तुकाराम सांस्कृतिक भवन येथे गुरुवारी (दि. १६) बेळगावातील विविध संघटनांतर्फे आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सुभाष ओऊळकर होते.

प्रारंभी नीला आपटे आणि सहदेव कांबळे यांनी प्रार्थना सादर केली. एक मिनित शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. कॉ. नागेश सातेरी यांनी शोक प्रस्तावाचे वाचन केले.

कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई सेक्रेटरी कॉ. मिलिंद रानडे म्हणाले, कॉ. कृष्णा मेणसे हे एका पिढीचे नेते होते. त्यांनी स्वातत्र्य लढ्यात भाग घेतला. देश स्वातंत्र झाल्यानंतर त्याची फळे सामान्य जनतेला काय मिळाली, हे त्यांना पाहता आले. यासाठी त्यांना चळवळी, आंदोलने, लढे या माध्यमातून कार्य केले. लोकांचा विकास झाला पाहिजे, समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी त्यांनी काम केले.

महाराष्ट्र अंनिसचे सेक्रेटरी अनिल चव्हाण म्हणाले, आप्पांच्या निधनाने समाजाची हानी झाली आहे. आयुष्यभर एका विचारावर निष्ठा ठेवून त्यांनी कार्य केले. बसवेश्वर ते ज्ञानेश्वर या पुस्तकातून त्यांनी मानवता अधोरेखित केली. खरा इतिहास मांडला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा पुढे चालवणे ही आदरांजली ठरणार आहे.

धरणग्रस्त संघटनेचे नेते कॉ. संपत देसाई म्हणाले, बेळगाव परिसर हा सांस्कृतिक संकर झालेला भाग आहे. याठिकाणी वारकरी आणि लिंगायत विचारधारेचा संकर पाहावयास मिळतो. त्याचे संस्कार कॉ. मेणसे यांच्यावर झाले होते. त्यांना परिसराचे सांस्कृतिक, सामाजिक भान होते. गांधीपासून त्यांचा प्रवास मार्क्सवादापर्यंत झाला. गांधीवादी, मार्क्सवादी आणि सत्यशोधक विचारधारा त्यांनी जोपासली.

म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, आप्पांच्या ज्ञानाची, वयाची, कर्तृत्वाची बरोबरी करणारा एकही माणूस आज बेळगाव परिसरात नाही. साहित्यिक, राजकारणी, पत्रकारिता, क्रीडा क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील ते बेळगाव परिसरातील पहिले सत्याग्रही होते. त्यांचा त्याग विसरता येणार नाही.

यावेळी शिवाजी कागणीकर, ऍड. माधवराव चव्हाण, प्रा. शोभा नाईक, कॉ. जी. व्ही. कुलकर्णी, खेडूत शिक्षण संस्थेचे प्रा. आर. पी. पाटील, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी प्रा. विक्रम पाटील, प्राचार्य जे. बी. बारदेसकर, कॉ. जी. व्ही. कुलकर्णी, प्रा. दत्ता नाडगौडा, परशराम मोटराचे, शिवराज पाटील, जगदीश कुंटे, मीरा मादार, रणजित चव्हाण पाटील, नेताजी जाधव, प्रा. भाऊराव कातकर यांनी आदरांजली वाहिली.

व्यासपीठावर प्रकाश मरगाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन कॉ. अनिल आजगावकर, प्रा. अशोक अलगोंडी यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

मराठा मंडळ फार्मासी कॉलेजमध्ये “अवयवदान” विषयावर सेमिनारचे आयोजन

Spread the love  बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आज शनिवार दि. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *