शहीद दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन, शहीद दिनाचं महत्त्व काय?
स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा एक चेहरा येतो. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून मानला जातो.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव ही नावे त्यात अग्रणी आहेत. इंग्रजी सरकारच्या ‘पब्लिक सेफ्टी बिल अॅन्ड ट्रेड डिस्ट्रिब्यूशन बिल’ च्या विरोधात भगतसिंहांनी सेट्रंल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला होता. त्यावेळी त्यांनी स्वत: ला पोलिसांच्या हवाली केलं.
लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या घातल्या. नंतर या प्रकरणाचा ठपका ठेऊन भगतसिंहावर खटला चालवण्यात आला. या प्रकरणात भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची अंमलबजावणी 1931 साली करण्यात आली. त्यांना 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी फाशी देण्यात आली होती. हाच दिवस देशात शहीद दिन म्हणून मानला जातो.
भगतसिंह लहान असताना 1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी शस्त्राच्या बळावर इंग्रजी व्यवस्था उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. भगतसिंहावर रशियन राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव होता. भारतातही स्वांतत्र्यांनंतर समाजवाद रुजला जावा यासाठी ते प्रयत्नशील होते. ते केवळ एक क्रांतीकारक नव्हते तर एक विचारकदेखील होते. त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली.