नवी दिल्ली – कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. कोरोनामुळे देशात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. यात अनेकांनी आपले आई-वडील, आजी-आजोबा तर कुणी आपले भाऊ-बहीण गमावले आहेत. अनेक मुलं अनाथ झाली आहेत. अशात त्यांना दिलासा देण्यासाठी कॉरपोरेट कंपन्या विविध प्रकारचे प्रयत्न करत आहेत. यातच टाटा स्टीलने अशा लोकांसाठी मोठी घोषणा करून पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.
“आपल्या कुठल्याही कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना त्या कर्मचाऱ्याच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत (म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याच्या रिटायरमेंटच्या वयापर्यंत) संपूर्ण वेत देण्यात येईल. एवढेच नाही तर, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण व्यवस्थादेखील कंपनीच करेल आणि अशा कुटुंबांना वैद्यकीय तसेच निवासाची सुविधाही मिळत राहील, अशी घोषणा टाटा स्टीलने केली आहे.
या शिवाय, त्यांच्या फ्रंट लाईन वर्कर्ससंदर्भातही कंपनीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपले कर्तव्य बजावत असताना एखाद्या फ्रंटलाईन वर्करचा मृत्यू झाला, तर कंपनी व्यवस्थापन त्यांच्या मुलांचा भारतात पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार आहे.
काय म्हटले आहे, कंपनीने –
टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटले आहे, “कंपनी व्यवस्थापन नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि भागधारकांच्या हितासाठी कार्यरत आहे. या कोरोना साथीच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी प्रयत्न करत आहे.” यापूर्वीही टाटाने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक पावले उचलली आहेत आणि एक स्टँडर्ड सेट केला आहे.