बेळगाव : मानसिक तणावातून मनस्थिती बिघडल्यामुळे मजगाव येथील एका इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मजगाव नजीकच्या येळ्ळूर शिवारात आज सकाळी उघडकीस आली.
नेमिनाथ सातगौडा पुजारी (वय 45 वर्षे, रा. पुजारी गल्ली, मजगाव) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नांव आहे. नेमिनाथ याची पत्नी त्याला सोडून गेली असून त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.
दारूचे व्यसन असणाऱ्या नेमिनाथ पुजारी यांची मनस्थिती अलीकडे बिघडली होती असे समजते. आज सकाळी येळ्ळूर शिवारात मजगाव नजीकच्या रेल्वे फाटकाजवळील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या पॅन्टच्या खिशात एक मोबाईल आणि कागदाच्या कांही चिठ्ठ्या आढळून आल्या. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी सिव्हील हॉस्पिटलकडे धाडला. याप्रकरणी वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.