सांगली : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज, बुधवारी सांगलीत भाजप वगळता सर्व पक्ष, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते अॅड. अजित सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकार्यांना याप्रश्नी निवेदनही देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांची होणारी कुचंबणा थांबवावी, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, संतपूरसह 850 गावे केंद्रशासित करावीत, कर्नाटक सरकारकडून सातत्याने होणारे मराठी भाषिकांवरील हल्ले थांबवावेत, हल्ले करणार्या कन्नडिगांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सांगली शाखेचे अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की, कर्नाटकात साठ वर्षाहून अधिक काळ मराठी भाषिक जनता बेळगावसह 850 गावांचा सीमाभाग महाराष्ट्राला जोडावा म्हणून सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहे. तरीही कर्नाटक सरकार त्यांच्यावर अन्याय करीत आहे. सातत्याने कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करीत आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्राच्या मागणीप्रमाणे मराठी भाषिकांची गावे महाराष्ट्रात समाविष्ट करावीत, अन्यथा ती केंद्रशासित करावीत, अशी आमची मागणी आहे. आंदोलनात महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे नेते शेखर माने, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर, मयुर घोडके, रावसाहेब घेवारे, चंद्रकांत मैगुरे, अनिल शेटे, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, काँग्रेसचे रवी खराडे, नागरिक जागृती मंचचे सतिश साखळकर आदी उपस्थित होते.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …