Thursday , December 26 2024
Breaking News

लखन जारकीहोळी यांच्या विजयाने उत्तम पाटील यांचा करिष्मा अधोरेखित

Spread the love

निपाणी मतदारसंघातील वर्चस्व सिध्द : विधानसभेची तयारी

निपाणी (विनायक पाटील) : नुकतीच पार पडलेली विधानपरिषद निवडणूक बेळगाव जिल्ह्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. 2 जागांसाठी 3 मातब्बर उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने बेळगावी ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेल्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी, बेळगाव जिल्ह्यात राजकीय दबदबा निर्माण करणारे आमदार रमेश जारकीहोळी यांचे बंधू लखन जारकीहोळी व विद्यमान विधानपरिषद सदस्य व भाजपाचे पक्षप्रतोद महांतेश कवटगीमठ यांच्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अंतिम टप्प्यात इर्षा शिगेला पोहोचली होती. यामध्ये आमदार हेब्बाळकर व आमदार जारकीहोळी यांचे राजकीय हाडवैर चर्चेचा विषय होता. दोन्ही उमेदवारांनी विजयी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. अखेर अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी आणि काँग्रेसचे उमेदवार हट्टीहोळी यांनी विजय संपादन केला. त्यामध्ये जारकीहोळी यांच्या विजयासाठी बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील आणि युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांनी घेतलेले प्रयत्न विसरता येणार नाही. निपाणी मतदारसंघातील ग्रामपंचायतीमधील वर्चस्वानंतर विधानपरिषद निवडणूकीतही लखन जारकीहोळी हे निवडून आल्याने या मतदारसंघात युवा नेते उत्तम पाटील यांचा करिश्मा कायम राहिला आहे.
बेळगाव जिल्ह्यात भाजपाचे सर्वात जास्त आमदार असताना भाजपाचे विद्यमान आमदार महांतेश कवटगीमठ यांना पराभव पत्करावा लागल्याने आता भाजपला आत्मचिंतनाची वेळ आली आहे. अर्ज दाखल केल्यापासून मतदानाच्या दिवशीपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. त्यामध्ये निपाणी मतदारसंघाचे युवा नेते व आमदारकीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आपल्या कार्याने बाजी मारली आहे.
याबाबत मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे. युवा नेते उत्तम पाटील यांनी लखन जारकीहोळी यांच्यासाठी निपाणी मतदारसंघात केलेली व्यूहरचना यशस्वी झाल्याचे लखन जारकीहोळींच्या विजयाने अधोरेखित झाले आहे. निपाणी मतदारसंघात जारकीहोळी यांना मिळालेल्या मतामागे उत्तम पाटील यांचे परिश्रम महत्वाचे आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी मरगळलेल्या कार्यकर्त्यांना आपल्या मार्गदर्शनातून संजीवनी देण्याचे काम केले होते. ग्रामपंचायतीमधील विजयाची घोडदौड लक्षात घेऊन तितक्याच वेगाने त्यांनी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. त्यामुळेच आता त्यांनी विधान परिषदेची निवडणुकी ही यशस्वी करून दाखविली आहे. ही विधान परिषदेची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम ठरल्याची चर्चा आता राजकीय गोटासह कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मतदार संघात उत्तम पाटीलच ’किंगमेकर’ ठरल्याची भावना मतदारसंघात निर्माण झाली आहे.
सध्या निपाणी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या आमदार, नामदारही आहेत. शिवाय अनेक संस्था व आर्थिक पाठबळ असताना निपाणी मतदारसंघात भाजपा उमेदवारांना मिळालेली मते नगण्य होती. उत्तम पाटील यांनी मतदारसंघातील कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेवून निवडणुकीची धुरा हाती घेतली. या निवडणुकीत जारकीहोळी यांना मिळालेली मते निपाणी मतदारसंघात उत्तम पाटील यांचे वर्चस्व सिध्द करण्यात कारणीभूत ठरले आहेत एकंदरीत ग्रामपंचायती नंतर पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने उत्तम पाटील यांनी आपला करिष्मा दाखवला आहे.

——————————————————–
एकहाती धुरा
यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उत्तम पाटील यांनी कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकली होती. आश्वासक नेतृत्व मिळाल्याने मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवून निपाणी मतदारसंघात ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व निर्माण केले. हे सर्व करत असताना युवानेते उत्तम पाटील यांनी एक हाती धुरा सांभाळली होती. तोच पॅटर्न वापरून विधान परिषद निवडणुकीत त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त निपाणी चर्चमध्ये विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील कोल्हापूर वेसवर असलेल्या बागेवाडी कॉलेजसमोरील चर्चमध्ये बुधवारी (ता. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *