बेळगाव : शीतपेयांच्या टेट्रापॅकमधील अॅल्युमिनियम मिळवण्यासाठी क्लब रोडवरील रस्त्याशेजारी असलेल्या झाडांखाली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांकडून कचरा पेटवून देण्याचा गैरप्रकार सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला. त्यामुळे रस्त्याकडेला कचरा टाकू, नका जाळू नका, परिसर स्वच्छ ठेवा हे सर्व नियम फक्त जनतेलाच लागू आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कॅम्प हद्दीतील क्लब रोडवरील ज्योती कॉलेजसमोर आज सकाळी महापालिकेच्या दोन कचरा गाड्या (क्र. केए 22 ए 9640 आणि केए 22 बी 8385) रस्त्यावर थांबून स्वच्छता कर्मचारी शेजारील मोठ्या झाडांखाली कचरा एकत्र करून जाळत होते. हा गैरप्रकार त्या रस्त्यावरून जाणारे सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपली गाडी थांबवून त्या स्वच्छता कर्मचार्यांना जाब विचारला.
तेंव्हा प्रथम उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यानंतर पेटवलेला कचरा विझवला. त्यावेळी त्या कचर्यात मोठ्या प्रमाणात शीतपेयांचे अॅल्युमिनियमचे टेट्रापॅक असल्याचे अनगोळकर यांच्या निदर्शनास आले आणि कचरा पेटवण्याचा मूळ उद्देश त्यांच्या ध्यानात आला. तथापि या पद्धतीने कचरा पेटवून दिल्यामुळे झाडांचे मुळापासून नुकसान होणार असल्याने सुरेंद्र अनगोळकर यांनी स्वच्छता कर्मचार्यांना चांगलेच धारेवर धरले.
दरम्यान, टेट्रापॅकच्या अॅल्युमिनियममधून चार पैसे मिळवण्यासाठी या पद्धतीने शहरात अन्यत्रही स्वच्छता कर्मचार्यांकडून हा प्रकार सर्रास केला जात असल्याचे समजते. मात्र महापालिका हद्दीतील कचरा कॅम्प हद्दीतील झाडांखाली जाळण्याच्या या प्रकाराबद्दल वृक्षप्रेमीमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
तसेच लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वृक्षराईचे नुकसान करणार्या अशा गैरप्रकारांना तात्काळ आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.
Check Also
१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे
Spread the love बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू …