बेळगाव : अन्य कोणत्याही देशांच्या तुलनेत भारतात युवावर्गाची संख्या जास्त आहे. त्यामुळेच आपल्या देशाला यंग इंडिया म्हणून ओळखले जाते. कोविड विरोधातील लढ्यातही युवावर्गाने लसीकरण करून घेऊन आघाडीवर रहावे, असे आवाहन जलसंसाधन खात्याचे व जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले. बेळगावातील एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयात सोमवारी १५ ते १८ वयोगटातील किशोरांच्या लसीकरण मोहिमेचे उद्घघाटन केल्यावर ते बोलत होते. विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, तुमचे आई-वडील, आजी-आजोबा यांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यामुळे तुम्हीही न घाबरता लस घ्या. लस घेण्याबाबतचे गैरसमज दूर करून प्रत्येकाने लस घेतली पाहिजे तसेच इतरांनाही लस घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. देशात येत्या १० डिसेंबरपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोरोनामुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही परिश्रम घेतले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
मंत्री कारजोळ पुढे म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात दररोज ६ हजार जणांच्या चाचण्या करण्याची व्यवस्था केली आहे. सध्या आमच्याकडे १ लाख ४३ हजार कोवॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध आहेत. येत्या १-२ दिवसांत आणखी १ लाखाहून अधिक डोस मिळण्याची अपेक्षा आहे. आमच्याकडे लसीची कमतरता नाही. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यानाही कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांना दुष्परिणाम जाणवलेला नाही. त्यामुळे कोणीही न घाबरता लसीचे दोन्ही डोस घ्यावेत असे आवाहन मंत्री कारजोळ यांनी केले.
त्यानंतर बोलताना खा. मंगल अंगडी म्हणाल्या, सरकारने १५ ते १८ वयोगटातील किशोरांच्या लसीकरण मोहिमेला प्रारंभ केला आहे. त्याचा लाभ घेऊन किशोरांनी न घाबरता लस घेतली पाहिजे. निरोगी राहण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकार केले पाहिजे. त्याचप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने कोविडचे नियम पाळून जागरूकता दाखवण्याची गरज आहे असे सांगितले.
यावेळी उत्तरचे आ. अनिल बेनके, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, एसपी लक्ष्मण निंबरगी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ आदी उपस्थित होते.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …