बेळगाव – मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी बेळगावच्या आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. या मैदानाच्या तयारीसाठी कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारीही चालविली होती. बेळगाव परिसरातील कुस्तीगीर आणि कुस्ती शौकिनांना आनंदवाडी येथील रविवारच्या कुस्ती मैदानाचे वेध लागले होते. दरम्यान शासनाने वाढत्या कोरोना आणि ओमिक्रोन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात आगामी दोन आठवड्यांसाठी विकेंड लॉकडाऊन जारी केला आहे. विकेंड लॉकडाऊनमुळे, शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण व्यवहार ठप्प राहणार आहेत. विकेंड लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. याची दखल घेऊन जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने आज बुधवारी तातडीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत रविवारी आयोजित करण्यात आलेले कुस्ती मैदान पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कुस्ती मैदानाची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल असेही निश्चित करण्यात आले. या बैठकीला अध्यक्ष मारुती घाडी यांच्यासह वाय. पी. नाईक, अशोक हलगेकर, मल्लाप्पा हिंडलगेकर, हिरालाल चव्हाण, सुहास हुद्दार, पोम्माणी कुन्नुरकर, संतोष होंगल, नवरत्न सिंग पोवार, विलास घाडी, बाळाराम पाटील आदी उपस्थित होते.