बेळगाव (वार्ता) : लाज सोडून पदयात्रा काढणार्यांना काय बोलावे? काही बोलल्यास काँग्रेस नेत्यांना राग येतो अशा शब्दांत बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी उद्वेग व्यक्त केला. बेळगावात बुधवारी 73 व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, स्वातंत्र्यापासून मागास राहिलेल्या उत्तर कर्नाटक प्रदेशाच्या विकासासाठी बोम्मई नेतृत्वाखालील भाजप सरकार प्रयत्नशील आहे. उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी सरकार अर्थसंकल्पामध्ये अधिक निधीची तरतूद करेल. अधिकाधिक विकास योजना राबवले. येथील कच्च्या मालाचा वापर करून पक्का माल तयार करणारे कारखाने अधिक प्रमाणात उभारून रोजगार आणि उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे ते म्हणाले.
म्हादई, कृष्णा आणि कावेरी योजना सर्वोच्च न्यायालयात आहेत. राज्याच्या वाट्याचे पाणी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. उत्तर कर्नाटकाच्या पाणी योजनांसाठी काँग्रेसनं सत्तेत असताना प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. 2013 ते 2018 पर्यंत राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने यासाठी काय केले असा प्रश्न करून मंत्री कारजोळ म्हणाले, म्हादई, अपर कृष्णा आणि मेकेदाटू योजनांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यांचा निकाल लवकर लागावा यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. आमच्या वाट्याचे पाणी वापरण्यास लवकरच प्रारंभ करू असेही सांगितले.
काँग्रेसच्या मेकेदाटू पदयात्रेबाबत बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर विकासासाठी भरीव कार्य केले नाही. खासकरून उत्तर कर्नाटकाच्या पाणी योजनांसाठी काहीच काम केले नाही. यापूर्वी कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रातही काँग्रेस सरकारच होते. मग त्यांना त्यावेळी विकास का करता आला नाही? आम्ही हे विचारल्यावर काहींना राग येतो. झालेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत असा दावा त्यांनी केला. एकंदर पाणी योजनांबाबत उत्तर कर्नाटकावर काँग्रेसने मोठा अन्याय केला आहे असा आरोप मंत्री गोविंद कारजोळ यांनी केला.
Check Also
१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे
Spread the love बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू …