पणजी: पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यातील लढतीकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले होते. भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्यांना भाजपला टक्कर देण्यात अपयश आले आहे. उत्पल पर्रीकर यांचा 713 मतांनी पराभव झाला आहे. पणजीत बाबूश मोन्सेरात यांनी भाजपचा गड राखला. पणजीत भाजप समर्थक जल्लोष करत आहेत, तर उत्पल पर्रीकर यांच्या गोटात शांतता आहे.
गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच पणजीत भाजपचा उमेदवार कोण असणार या चर्चेला उधाण आले होते. उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यामध्ये भाजपने मोन्सेरात यांना पसंती दिली. नाराज उत्पल पर्रीकर यांनी भाजप विरोधात बंड पुकारत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पर्रीकर यांनी पणजीत जोरदार प्रचार केला. घरोघरी जाऊन त्यांनी लोकांची भेट घेतली. अनेक भाजप समर्थक पर्रीकर यांच्या पाठीशी उभे होते. मात्र पर्रीकर यांना बाबूश मोन्सेरात यांना हरवण्यात अपयश आले आहे.
शिवसेनेने उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. पणजीत पर्रीकर यांना समर्थन देण्यासाठी शिवसेनेने आपल्या उमेदवाराला माघार घ्यायला लावला होता. आम आदमी पार्टीने देखील पर्रीकर यांना पक्षात सामील होण्याचे आमंत्रण दिले होते. प्रचारादरम्यान बाबूश मोन्सेरात यांनी विजय संपादन करण्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा अखेर खरा ठरला. पणजीच्या जनतेने मोन्सेरात यांना विजयी केले. भाजप समर्थक आणि नेते या निकालानंतर आनंद व्यक्त करत आहेत.