कठोर कारवाईची हिंदु संघटनांची मागणी
कोल्हापूर : राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात हिंदू धर्मातील कन्यादान विधी, त्यांतील मंत्र आणि पुरोहितवर्ग यांचा अपमान केला. तसेच उपस्थितांना ‘या विधींच्या माध्यमातून बहुजन समाजाला फसवले जात आहे’ असे वक्तव्यही केले. त्यांनी या भाषणातून एका समाज घटकाच्या विरोधात जातीय तेढ निर्माण होईल, अशी भाषा वापरली आहे. दुर्देवाने त्यांच्या समोर आणि व्यासपिठावर बसलेले बहुतांश लोक हे हिंदूच होते, तरी त्यांच्या या जात्यंध विधानाला सर्वजण हसून प्रतिसाद देत होते. एकीकडे भोंग्यांच्या विषयावर मुसलमान समाजाच्या भावना दुखावतात, म्हणून त्याला विरोध करायचा आणि दुसरीकडे हिंदूंच्या धार्मिक विधींची टिंगल करत स्वतःच हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवायच्या, यातून अमोल मिटकरी यांना कोणत्या ‘वोट बँके’ची चिंता आहे आणि कोणत्या ‘वोट बँके’विषयी द्वेष आहे, हे स्पष्ट दिसून येते. कन्यादान विधीचा मंत्र म्हणत जी टिंगल अमोल मिटकरींनी केली, तशी ‘अजान’ची टिंगल करण्याची हिंमत मिटकरींमध्ये आहे का? असा सवाल समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने श्री. सुनील घनवट यांनी केला आहे.
कोल्हापूर येथे गांधीनगर पोलीस ठाण्यात समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात 21 एप्रिल या दिवशी धर्मप्रेमी श्री. विक्रम चौगुले आणि श्री. अजित पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. यावेळी सर्वश्री राजू यादव, विराग करी, प्रकाश मुदुगडे, अनिल दळवी, श्रीकांत शिंदे, अजित(अप्पा) पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. निवास यमगर, ग्रामपंचायत सदस्य श्री. रमेश वाईंगडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि बाबासाहेब श्री. भोपळे उपस्थित होते. कोणीही उठावे आणि हिंदु धर्मातील धार्मिक विधींची थट्टा करावी, हे आता सहन केले जाणार नाही. या विरोधात सनदशीर मार्गाने विरोध करत आंदोलन करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपिठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनीही या जात्यंध आणि हिंदु धर्मविरोधी टिंगल करण्याला जोरजोरात हसत दाद दिली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्रीच जर दोन समाजात तेढ निर्माण करणार्यांना साथ देत असतील, तर राज्यात सामाजिक न्याय टिकून राहिल का, याबाबत शंका निर्माण होते. या घटनेनंतर राज्यभरातून टिका झाल्यावर जयंत पाटील यांनी ‘मी त्या विधानांविषयी दिलगिरी व्यक्त करतो’, असे विधान केले आहे, तसेच धनंजय मुंडे यांनी ‘अमोल मिटकरी जे बोलले ते वैयक्तिक बोलले. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता’, असे सांगून या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे, तर आमदार मिटकरी यांनी ‘वाचा मौनस्य श्रेष्ठम्’, असे ट्विट केले आहे. वास्तविक अशा प्रकारची वरवरची क्षमायाचना अपेक्षित नसून असे प्रकार राजकीय पक्षातील लोकांकडून वारंवार का होतात? याचा विचार करण्याची आवश्यक आहे. त्याचप्रकारे स्वत: केलेल्या वक्तव्यावर क्षमा न मागता संस्कृत श्लोकांचा आधार घेऊन मिटकरी हे अद्याही क्षमा मागण्यास सिद्ध नाहीत, असेच म्हणावे लागेल. तरी समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदु समाजाची जाहीर क्षमायाचना करावी, अशी मागणी केली आहे.
Check Also
मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू
Spread the love मुंबई : मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …