विजापूर : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या युद्धानंतर भारतीय विद्यार्थ्यांना शर्थीच्या प्रयत्नातून मायदेशी परत आणण्यात आले. युद्धग्रस्त भूमीतून सदर विद्यार्थी मायदेशीर परतले. मात्र आता त्यांच्या उर्वरित शिक्षणाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दरम्यान विजापूरमधील माजी मंत्री एम. बी. पाटील यांच्या पुढाकारातून काही विद्यार्थ्यांना वैद्यकीय शाखेअंतर्गत मार्फत मोफत शिक्षण देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
विजापूरमधील माजी मंत्री एम. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या बीएलडीई संस्थेत युक्रेन रिटर्न विद्यार्थ्यांना सध्या मोफत शिक्षण पुरविले जात आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याकारणाने सदर देशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र कात्रीत सापडले आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी एम. बी. पाटील यांनी मोफत शिक्षण पुरवत विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घेत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील 62 युक्रेन रिटर्न आणि 12 चायना रिटर्न विद्यार्थ्यांना सध्या या विद्यापीठात शिक्षण पुरविण्यात येत आहे. अशा अडचणीत असलेल्या आणखीन विद्यार्थ्यांना या शिक्षण संस्थेत शिक्षणाची संधी दिली जाईल, असा भरवसा महाविद्यालयाचे डीन अरविंद बिरादार यांनी दिला आहे.
माजी मंत्री एम. बी. पाटील यांना युक्रेन आणि चायना रिटर्न विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी निवेदन केले होते. युक्रेनमधील युद्धामुळे आपल्या शिक्षणाची चिंता लागलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण पुरवून विजापूरमधील बीएलडीई संस्था राज्यात आदर्शवत ठरली आहे. मोफत शिक्षण, प्रॅक्टिकल, ग्रंथालय सुविधा यासह सोशल मीडियाच्या माध्यमातून सुलभ प्रवेश प्रक्रिया बीएलडीई शिक्षण संस्थेने उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक समस्या समोर असून देखील बीएलडीई शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना शिक्षणासहित अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. खाजगी शिक्षण संस्थांचा खर्च न परवडल्याने विद्यार्थ्यांनी परदेशाची वाट पकडली. मात्र अचानक सुरु झालेल्या युद्धामुळे पुन्हा माघारी परताव्या लागलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या उर्वरित शिक्षण यक्षप्रश्न सतावत होता. याचदरम्यान दूताप्रमाणे मदतीसाठी धावून आलेल्या बीएलडीई संस्थेचे आणि माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचे राज्यभरात कौतुक होत आहे.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …