नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचं तीन दिवसीय चिंतन शिबीर आजपासून सुरू होत आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आलं असून यासाठी काँग्रेसचे सर्व अधिकारी-पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. याच शिबिरात मोठे संस्थात्मक बदल घडणार असल्याची माहितीही मिळत आहे.
या शिबिरामध्ये एक कुटुंब, एक तिकीट हा नवा नियम लागू होण्याचीही शक्यता आहे. त्यासंदर्भात बोलत असताना ज्येष्ठ काँग्रेस नेते अजय माकन यांनी या मुद्द्यावर सर्वांचं एकमत असल्याचं सांगितलं आहे. माकन म्हणाले, पक्षात किमान 5 वर्षे काम केलेलं असल्याशिवाय पक्षाचे कोणतेही नेते आपल्या नातेवाईकांना, मुलांना तिकीट देऊ शकणार नाहीत. यासंदर्भात मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर पॅनेलवरच्या सर्व सदस्यांचं एकमत आहे.
सतत एकाच पदावर राहिलेल्या व्यक्तीला पायउतार व्हावं लागेल. जर त्याच व्यक्तीला पुन्हा त्याच पदावर बसवायचं असेल, तर दरम्यान तीन वर्षांचा कालावधी जाणं गरजेचं असेल असंही माकन यांनी सांगितलं.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि गांधी कुटुंबीय हे उदयपूरमधील तीन दिवसीय चिंतन शिबिरासाठी उपस्थित आहेत. 2024 च्या निवडणुकीची रणनीती ठरवण्याच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला नवसंकल्प चिंतन शिबीर असं नाव देण्यात आलं आहे. या शिबिराच्या माध्यमातून ध्रुवीकरणाच्या राजकारणाशी लढण्याचे मार्गही शोधण्यात येणार आहेत.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …