Saturday , October 19 2024
Breaking News

जैन समाजाचा आचार आणि विचारातून अहिंसेचा संदेश : उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

सांगली : अहिंसा परमोधर्म, जगा आणि जगू द्या, या तत्वांचे आचरण करुन संस्कृतीशी एकरुप झालेला जैन समाज आहे. सामाजिक भान जपणाऱ्या जैन समाजाच्या मागण्या, प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी जैन समाजाला जे-जे देता येईल ते-ते देण्याचा प्रयत्न केला जाईल, यासाठी राज्य शासन यत्किंचितही कमी पडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेच्या महाअधिवेशनात बोलताना दिली.

दक्षिण भारत जैन सभेचे १०० वे महाअधिवेशन (त्रैवार्षिक) नेमिनाथ नगर सांगली येथे संपन्न झाले. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सुमनताई पाटील, आमदार सुरेश खाडे, बेळगावचे आमदार अभय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी मंत्री कल्लापाआण्णा आवाडे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून आलेले श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जैन समाजाने आपल्या आचार आणि विचारातून अहिंसेच्या तत्वातून प्रेमाचा संदेश दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जैन समाजाने दातृत्वातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाचे असणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्व संबंधितांची मुंबई येथे बैठक घेऊन समाजाचे प्रश्न समाजवून घेऊन ते मार्गी लावले जातील.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जात-पात, धर्म या यापेक्षा माणुसकीचा विचार मोठा आहे. मानवधर्माचा विसर कोणालाही पडू नये यासाठी जैन धर्माचे विचार आणि आचार आचरणात आणणे गरजचे आहे. जैन समाजाचे या विचारानेच कार्य होत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. सर्वांचे हित साधून प्रत्येक संकट काळात मदतीसाठी पुढे येणाऱ्या या समाजाला शासनही सर्वतोपरी सहकार्य करील. जैन समाजाच्या विकासासाठी अन्य राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनाही महाराष्ट्र राज्यात राबवून या योजनांचा लाभ जैन समाजाला मिळवून दिला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *