Saturday , October 19 2024
Breaking News

मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील : मंजुनाथ भारती स्वामींचे प्रतिपादन

Spread the love

बेळगाव : संस्कार- संस्कृती टिकविणे हाच मानवधर्म आहे. गुरुवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कृती आणि एकात्मतेचे दर्शन घडले आहे. मराठा दुःखी पिडीत, असहाय्य असलेल्यांसाठी काम करणारा खरा क्षत्रिय आहे. मराठा समाज शास्त्रीयदृष्ट्या मर्यादित राहणार आहे. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील नेत्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्याचबरोबर नेत्यांनाही समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील, असे प्रतिपादन बंगळुरू गोसावी मठाचे श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी बोलताना केले.

वडगाव येथील आदर्श विद्या मंदिराच्या मैदानावर सकल मराठा समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी श्री श्री मंजुनाथ भारती स्वामींजी बोलत होते. प्रारंभी मंजुनाथ भारती स्वामी, भगवान गीरी महाराज, स्वामी सोहम चैतन्यपुरी वेदांताचार्य महाराज आदींच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले.
दत्ता जाधव, मोहन पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर व सुनील जाधव दांपत्याच्या हस्ते स्वामींची पाद्यपुजा करण्यात आली.

कोणाच्या बापाचे सरकार याचे घेणेदेणे नाही : आम. निंबाळकर

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित खानापूर आमदार डॉ. अंजली निंबाळकर आपल्या मनोगतात बोलताना म्हणाल्या, मराठा समाज विस्कळीत झाला आहे. मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी एकी काळाची गरज आहे. कर्नाटकातील मराठा समाजाच्या एकीच्या प्रयत्नातूनच विकास निगम स्थापन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी देण्यात आलेला निधी अपुरा आहे. राज्यातील 70 लाख मराठा समाजाच्या प्रगतीसाठी भरीव निधीची आवश्यकता आहे. सरकार कोणाच्या बापाची आहे याचे देणे-घेणे न ठेवता, सर्वांगीण उन्नतीसाठी आरक्षण मागावेच लागेल असे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

मराठा सर्वांना एकत्र घेऊन जाणारा समाज : आम. बेनके

आमदार अनिल बेनके यांनी मराठा नावात मोठी ताकत असून जगाला मार्गदर्शक ठरेल असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजानी निर्माण केला. त्यामुळे मराठा समाजाबद्दल सर्वांमध्ये आदर असून मराठा समाज कोणाचाही तिरस्कार करणारा नसून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भुमिका मराठा समाजाची असते. सकल मराठा समाजाचे ध्येय साध्य करण्यासाठी संघटीत प्रयत्न आवश्यक आहेत, असे मत बेनके यांनी व्यक्त केले.

अश्या राजकारण्यांना घरीच बसवावे लागेल : रमाकांत कोंडुस्कर
रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, आपण एकत्रित झालो तर ताकत वाढणार असून समाजावर होत असलेला अत्याचार कमी करुन घेण्यास मदत होत आहे. मराठा समाजाची मुल पुढे येणे गरजेचे असून शेतकरी वर्गावर अन्याय होउ नये यासाठी सकल मराठा समाज प्रयत्नशील असणार आहे. शिवाजी राजांचा अपमान करणाऱ्याना दोन दिवसात सोडले जाते. मात्र अपमान करणाऱ्यांना त्रास दिला जातो मात्र येणाऱ्या काळात सर्वांनी संघटीत झाल्यास मराठा समाजाची ताकत वाढणार आहे. येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करुन घेतला जाणार नाही. महाराजांच्या नावावर मतांची भीक मागणाऱ्या राजकारण्यांना घरातच बसवावे लागेल असे मत व्यक्त केले.
मराठा प्राधिकरण निगमचे अध्यक्ष मारूती मुळे यांनी मराठा विकास प्राधिकरणतर्फे मिळालेल्या संधीचा लाभ घेत समाजाला न्याय मिळवून देणार आहे. जिजाऊ जल भाग्य योजणेतून शेतकऱ्याना मदत केली जाणार आहे. तसेच शेतकरी, युवक यांच्यासाठीही विविध योजना राबविल्या जाणार आहेत अशी माहिती दिली.
किरण जाधव यांनी, सकल मराठा समाज माध्यमातून पुढील काळात सामाजिक, शैक्षणिक विधायक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांत चार्य परमपूज्य मंजुनाथ आरती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमनिमित्त काढण्यात आलेल्या स्वामीजींच्या भव्य सवाद्य शोभायात्रेने आज रविवारी सकाळी सारा परिसर दणाणून सोडताना बेळगावातील मराठा समाजाचे विराट दर्शन घडविले.

सकल मराठा समाज बेळगावतर्फे गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त आयोजित हजारो मराठा बंधू-भगिनींचा सहभाग असणाऱ्या शोभायात्रा आज सकाळी अपूर्व उत्साहात पार पडली. शोभा यात्रेपूर्वी प्रारंभी शहापूर छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मराठ्यांच्या पारंपरिक तूतारीच्या ललकारीसह सनई चौघड्यांच्या मंगलमय निनादात स्वामीजींचे स्वागत करण्यात आले.

स्वामीजींनी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन केल्यानंतर शहापूर छ. शिवाजी उद्यान येथून हरहर महादेव या गर्जनेनेसह शिवरायांसह भवानीमातेच्या जय जयकारात शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेच्या अग्रभागी परमपूज्य श्री मंजुनाथ स्वामीजी रथामध्ये विराजमान झाले होते. त्याचप्रमाणे हत्तीवरील सजविलेल्या अंबारीत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती विराजमान झाली होती. शोभायात्रेतील हत्ती, घोडे विशेष करून डोक्यावर मंगल कलश घेऊन निघालेल्या सुहासिनी आणि भगवे फेटे परिधान केलेले मराठा समाज बांधव सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होते.

शोभायात्रेच्या पुढे ढोल व झांज पथकांसह लेझीम पथक आणि भजनी मंडळे होती. या या सर्व वाद्यवृंदाच्या गजरामुळे शोभायात्रेचा मार्ग दणाणून गेला होता. त्याचप्रमाणे शोभायात्रेत शिवकालीन लाठी फिरवणे, तलवारबाजी दांडपट्टा आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जात होती. सध्या उष्म्याचे दिवस असल्यामुळे सकल मराठा समाज तसेच मराठा समाजातील अन्य दानशूर व्यक्ती आणि संघ संस्थांतर्फे शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी पाण्याच्या बाटल्या आणि शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था सुरळीत पार पडण्यासाठी मराठा समाजाच्या भगिनींनी विशेष पुढाकार घेतला होता. या भगिनी स्टॉलवरून शीतपेय पुरविण्याबरोबरच स्वतः मोठा ट्रे घेऊन शोभायात्रेत फिरून शीतपेयांचे वितरण करत होत्या.

गुरुवंदना कार्यक्रम आणि शोभायात्रेला बेळगाव शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या स्वरूपात कणखर नेतृत्व तर लाभलेच आहे, याव्यतिरिक्त खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर, किरण जाधव, रमाकांत कोंडुस्कर, रमेश गोरल, जयराज हलगेकर, गुणवंत पाटील, यांनी देखील या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.

शोभायात्रेत त्यांनी आपल्या पाठीराख्यांसमवेत आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे खानापूरमधून आलेल्या मराठी बांधवांचा उत्साह अधिकच दुणावला होता. मराठा समाज बांधवांचा हजारोंचा लवाजमा असलेल्या या मराठमोळ्या शोभायात्रेची मोठ्या जल्लोषात शहापूर खडेबाजार रस्त्यावरून नाथ पै सर्कल मार्गे वडगाव रस्त्यावरून आदर्श विद्यामंदिर मैदानावर गुरुवंदना कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *