Saturday , October 19 2024
Breaking News

विद्यार्थ्यांनी पुन्हा गजबजल्या शाळा!

Spread the love

बेळगाव : बेळगावसह संपूर्ण राज्यात आज सोमवार दि. 16 पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. शाळा परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे.
दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरू केल्या जात होत्या. परंतु यंदाच्या 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी 15 दिवस आधीच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काल रविवार पासून घरोघरी पालकवर्ग आपल्या पाल्याला शाळेत धाडण्याच्या तयारीला लागला होता. काल रविवारी पालक व विद्यार्थ्यांनी दप्तर वह्या व इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती.
आज सकाळपासून शाळेतील वर्गात वेळेवर हजेरी लावण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची लगबग सुरू होती. लहान मुलांचा अपवाद वगळता प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेला जाण्यासाठी उत्सुक दिसत होता. त्यामुळे शहरातील शाळांकडे जाणार्‍या रस्त्यांवर गणवेशातील मुलामुलींची गर्दी पहावयास मिळत होती.
शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे प्रत्येक शिक्षण संस्था शाळा सुरू करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. शिक्षक वर्ग तर गेल्या शनिवारपासूनच शाळेत दाखल झाला होता. शनिवारी शाळांची स्वच्छता करण्यात आली, त्याचप्रमाणे काल रविवारी बर्‍याच शाळांमध्ये एसडीएमसी अर्थात शाळा सुधारणा समिती व पालकांची बैठक घेण्यात आली. शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे आज अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तोरणे बांधण्याबरोबरच कांही शाळांमध्ये प्रवेशद्वारावर आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली होती.
प्रत्येक शाळेत शिक्षकवर्ग विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सुहास्यवदनाने आणि उत्स्फूर्त स्वागत करताना दिसत होता. वार्षिक परीक्षेच्या सुट्टीनंतर आपला मित्र-मैत्रिणींचा गट पुन्हा एकत्र येणार असल्यामुळे विद्यार्थी- विद्यार्थिनींचा चेहर्‍यावर आनंद दिसत होता. पहिला दिवस असल्यामुळे बरेच पालक आपल्या मुलांना शाळेला सोडण्यासाठी आले होते. त्याचप्रमाणे बरीच भावंडे एकमेकांचा हात हातात धरून गणवेशात शाळेला येताना दिसत होती.
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गोड पदार्थ देऊन त्यांचे स्वागत केले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे पहिल्या दिवशी मिळणार्‍या दुपारच्या माध्यान्ह आहारासोबत किमान एक गोड पदार्थ देण्याचे निर्देश दिले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील 5,300 शाळा महिन्याभरानंतर आजपासून पूर्ववत सुरू झाल्या आहेत. कोरोना जरी कमी झाला असला तरी आवश्यक सर्व ती खबरदारी शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *