नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिद्धू यांच्या हल्ल्यात त्यावेळी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. दरम्यान सिद्धू यांना आता पंजाब पोलिसांकडून कधीही अटक होऊ शकते.
यापूर्वी सिद्धू यांनी रोड रेज प्रकरणी आपल्याविरुद्ध दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका फेटाळण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. सिद्धू यांनी पुनर्विलोकन याचिकेला उत्तर देताना सांगितले की, ही घटना 33 वर्षांपूर्वी घडली असून याचिका कायम ठेवण्यायोग्य नाही. सिद्धू यांनी आपल्या स्वच्छ प्रतिष्ठेचा हवाला देत या खटल्यातील आपल्या शिक्षेत बदल करू नये, अशी विनंतीही सर्वोच्च न्यायालयाला केली होती.
२७ डिसेंबर १९८८ रोजी वृद्धासोबत भांडण
हे प्रकरण २७ डिसेंबर १९८८ चे आहे. पटियाला येथे कारने जात असताना सिद्धू यांनी गुरनाम सिंग नावाच्या ६५ वर्षीय व्यक्तीला धडक दिली. या प्रकारानंतर दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात सिद्धू यांनी गुरनाम सिंग यांना धक्काबुक्की केली आणि त्यातच गुरनाम यांचा मृत्यू झाला. पटियाला पोलिसांनी सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर सिंग यांच्या विरोधात हेतुपुरस्सर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. १९९९ मध्ये ट्रायल कोर्टाने सिद्धूची निर्दोष मुक्तता केली होती, पण पंजाब हरियाणा हायकोर्टाने २००६ मध्ये सिद्धू यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. सिद्धू तेव्हा अमृतसरमधून भाजपचे खासदार होते. शिक्षेनंतर त्यांनी राजीनामा दिला. यानंतर सिद्धू यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले, उच्च न्यायालयाने शिक्षा दिली
त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी १९९९ मध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात संतप्त पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी २००६ साली हायकोर्टाने नवज्योतसिंग सिद्धू यांना तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
सर्वोच्च न्यायालयाने दंड ठोठावून माफ केले
हायकोर्टाने दिलेल्या शिक्षेविरोधात नवज्योत सिद्धू सर्वोच्च न्यायालयात गेले. १६ मे २०१८ रोजी, सुप्रीम कोर्टाने सिद्धू यांना आयपीसीच्या कलम ३०४ अंतर्गत हत्येच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले. पण, त्यांना गुरनाम सिंग यांना मारहाण करताना दुखापत करण्याच्या गुन्ह्यासाठी आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आणि केवळ एक हजार रुपयांचा दंड भरून सिद्धू यांची सुटका करण्यात आली.