आ. श्रीमंत पाटील : उगार खुर्दला पंचकल्याण महोत्सवात सहभाग
अथणी : अल्पसंख्याकांच्या यादीत येणारा जैन समाज आपल्या राज्यात मोठा आहे. मंत्रीपदी असताना या समाजाला विविध शासकीय सवलती व सुविधा मिळाव्यात, यासाठी भरपूर प्रयत्न केले. यापुढेही त्यांना सवलती मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील, असे मनोगत माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले.
उगार खुर्द येथे जैन समाजातर्फे आयोजित पंचकल्याण महोत्सवात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी चिकोडीचे खा. आण्णासाहेब जोल्ले, भाजपचे युवा नेते व अथणी पीएलडी बँकेचे अध्यक्ष शीतलगौडा पाटील उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, तू ही जग आणि इतरांना जगू दे, हे जैन समाजाचे तत्वज्ञान आहे. भगवान महावीर यांनी संपूर्ण देशाला अहिंसा धर्म शिकवला. त्या तत्वानुसार मानव धर्माची वाटचाल सुरू राहायला हवी. खा. जोल्ले म्हणाले, कोरोनामुळे बंद पडलेले धार्मिक कार्यक्रम पुन्हा सुरू होत आहेत. उगारमधील हा समारंभ पाहून समाधान वाटले. शीतलगौडा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उगार खुर्द नगरपालिकेचे सर्व सदस्य, पंचकल्याण महोत्सव कमिटीचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासह श्रावक-श्राविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …