Friday , October 25 2024
Breaking News

वादाच्या भोवऱ्यात अडकलेली खानापूर समिती!

Spread the love

एकीत खोडा घालणाऱ्यांना वेळीच आवरा

बेळगाव : खानापूर समितीची बिनशर्त एकीची घोषणा हवेतच विरली. दि. 24 एप्रिल रोजी हब्बनहट्टी येथे म. ए. समितीची बिनशर्त एकीची घोषणा झाली खरी पण ती घोषणाही फक्त घोषणाच राहिली. 2018 च्या विधानसभेच्या वेळी दोन गटात विखुरलेली समिती एकत्र यावी यासाठी तालुक्यातील समितिनिष्ठ कार्यकर्त्यांनी आणि ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण त्यांना कार्यकर्त्यांचे (किंबहुना नेत्यांचे) मनोमिलन करण्यात यश आले नाही असेच म्हणावे लागेल.
खरे तर एकीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर कार्यकारिणी निवड करणे अपेक्षित होते. मात्र घोषणेवेळी बिनशर्त एकी म्हणणार्‍या नेत्यांकडून अटी आणि शर्तीची पत्रके येऊ लागली. आणि इथेच खर्‍या अर्थाने एकीला सुरुंग लागला. दोन्ही गटांकडून एकमेकाला विश्वासात न घेता कार्यक्रम हाती घेण्यात येऊ लागले. गुप्त बैठकांवर जोर देण्यात आला आणि यातूनच संघटनेत गैरसमज पसरत गेले. वास्तविक एकीच्या प्रक्रियेनंतर दोन्ही गटातील ज्येष्ठ नेत्यांनी मिळून पुढील रूपरेषा ठरविणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. कुप्पटगिरी येथील जनजागृती सभा असो किंवा केंद्रीय मंत्री शरद पवार यांची बेळगाव मुक्कामी भेट घेणे असो दोन्ही गटामध्ये परस्पर विरोधी निर्णय घेण्यात आले. या सर्व प्रकारातून दोन्ही गटात अजून दुही निर्माण झाली.
हुतात्मा दिनी अभिवादन करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी संयुक्तपणे बैठक 30 मे रोजी बोलाविली होती. मात्र मध्यवर्तीशी संलग्न असणाऱ्या गटातील काही नेत्यांनी बैठकीआधीच देवाप्पा गुरव यांना हाताशी धरून सदर बैठकीचा व आपला काहीही संबंध नसल्याचे एक पत्रकाचे वाचन करून घेतले आणि ते देवाप्पा गुरव यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अनभिज्ञ ठेवून व्हिडीओ काढण्यात आला व तो व्हिडीओ प्रसारमाध्यमातून सर्वत्र प्रसारित करण्यात आला. त्यानंतर पुन्हा देवाप्पा गुरव यांच्या त्या व्हिडिओचा खुलासा करणारा दुसरा व्हिडीओ दिगंबर पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा प्रसारित करण्यात आला. याचदरम्यान असे निदर्शनास आले की दिगंबर पाटील गटाकडून बैठकीच्या आयोजनाचे एक पत्रक देवाप्पा गुरव व दिगंबर पाटील या ज्येष्ठ नेत्यांच्या सहीनिशी प्रसिद्ध करण्यात आले. त्या पत्रकावरील सही आणि त्याच दिवशी देवाप्पा गुरव यांनी वाचन केलेल्या पत्रकावरील सह्यामध्ये तफावत दिसून आले, असा लजास्पद प्रकार करण्यामागचा हेतू काय? याचाही विचार होणे गरजेचे आहे. अशा प्रकारांमुळे सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर 1 जुन रोजी हुतात्मा दिनी हिंडलगा येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगांवसह निपाणी, खानापूर समितीने एकत्रित अभिवादन केले मात्र खानापूर येथील दिगंबर पाटील गट बेळगावातील पेपर सम्राट व स्वयंघोषित नेत्याच्या शहर समिती सोबत वेगळे अभिवादन करण्यास उपस्थित राहिला आणि त्या वेळी संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी केली जी सीमाप्रश्नाच्या मूळ दाव्याला छेद देणारी होती. दिगंबर पाटील गट हा सीमाप्रश्नी नेमका कोणत्या मुद्द्यावर ठाम आहे हा एक संशोधनाचाच विषय आहे, कारण महाराष्ट्र सरकारकडे या गटाने 1993 च्या तोडग्यानुसार सीमाप्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे तर बेळगावात पेपर सम्राट सोबत असताना सीमाभाग केंद्रशासित करा अशी मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे या गटाला नेमके काय साध्य करायचे आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.
तर दुसरीकडे स्वत:ला मध्यवर्तीशी संलग्न असणारा गट एकीकडे बिनशर्त एकीची घोषणा करतो तर दुसरीकडे पाच अटी असल्याचेही सांगतो. कुप्पटगिरीची जनजागृती सभेचे आयोजन दोन्ही गटाच्या उपस्थितीत करण्यात आले होते, तशी पत्रकार परिषदही सर्वांसमक्ष घेण्यात आली होती. यावेळी बैठकीत उपस्थित असलेले समितीचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील आणि पांडू सावंत यांनी 15 मे रोजी गर्लगुंजी येथे सभेचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सभागृहातून बाहेर पडताच आपल्या या विधानाचा गोपाळ पाटील यांना विसर पडला की काय? असा प्रश्न समितीप्रेमी जनतेला पडला आहे. स्वतःला मध्यवर्तीशी संलग्न मानणाऱ्या गटाकडून जाणीवपूर्वक एकीची बेकी करण्याचा प्रयत्न होताना दिसत असल्याची चर्चाही सामान्य जनतेमध्ये चर्चिली जात आहे. सत्तेच्या लालसेपोटी राष्ट्रीय पक्षात गेलेल्या माजी आमदाराच्या सांगण्यावरून समिती संपुष्टात आणण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच एकीच्या प्रक्रियेवेळी दोन्ही गटांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती, त्यामुळे पुन्हा अध्यक्षांच्या राजीनाम्याची आवश्यकता नव्हती असे असताना त्यांनी आपल्या गटाचे अध्यक्ष देवाप्पा गुरव यांचा राजीनामा सादर केला आणि अत्यंत घाईगडबडीत दुसर्‍या गटाला विश्वासात न घेता अध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण करून नेमके काय साध्य केले असा प्रश्न जाणकार मंडळींना पडला आहे.
मागील तीन महिन्यांपासून एकीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार्‍या निष्ठावंतांची देखील कदर या मंडळींना नाही का? समिती टिकविणे मराठी, अस्मिता जपणे यापेक्षा स्वतःचा अहंकार कुरवाळत बसणार्‍या या नेत्यांना जनता खड्यासारखे बाजूला करेल यात शंकाच नाही.
एकीची प्रक्रिया सुरू असताना कोणा एका गटाचा अध्यक्ष निवडणे चुकीचे आहे असे सांगून देवाप्पा गुरव त्यांनी अध्यक्ष पद नाकारले. असे असताना समितीचे ज्येष्ठ नेते सुरेश देसाई यांनी ज्येष्ठ नेते सूर्याजी पाटील यांचे नाव सभेचे अध्यक्ष म्हणून सुचविले आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता सूर्याजी पाटील यांनी अध्यक्ष पद स्वीकारले आणि एकीला गालबोट लावत मध्यवर्तीशी संलग्न असणाऱ्या गटाचा अध्यक्ष निवडला गेला. याचा अर्थ सूर्याजी पाटील व सुरेश देसाई यांना समितीत बेकी कायम ठेवायची आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

एकीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार : माजी सभापती मारुती परमेकर


एकीच्या प्रक्रियेत देवाप्पा गुरव गटाकडून प्रमुख भूमिका बजावणारे समितीचे ज्येष्ठ नेते माजी सभापती मारुती परमेकर यांना अध्यक्ष निवडीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ही अध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्णत: चुकीची आहे.
एकीसाठी आग्रही असणारे देवाप्पा गुरव आणि मारूती परमेकर यांनी आपल्या गटातील मान्यवरांना सूचना केली होती की, दिगंबर पाटील गटाशी एकदा सविस्तर चर्चा करून मध्यवर्तीच्या ध्येय धोरणाशी जुळवून घेण्यासंदर्भात विचारणा करावी व त्यानंतर अध्यक्ष निवड करू असे सांगितले असताना आपल्याच गटातील काही सदस्यांनी अडेलतट्टूपणा दाखवत अध्यक्ष निवड केली आणि एकीला बेकीचे सुरुंग लावले. त्यांचे हे धोरण आपल्याला मान्य नव्हते म्हणून आपण ती सभात्याग करून सभागृहातून बाहेर पडलो असे मारुती परमेकरांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आणि यापुढेही आपण दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील असणार असेही ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

काळ्या दिनाला परवानगी देऊ नये : कन्नड संघटनांची कोल्हेकुई

Spread the love  बेळगाव : १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनासाठी कोणत्याही कारणास्तव परवानगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *