बेळगाव : सौंदत्ती मतदारसंघ हा मूळचा काँग्रेसचाच आहे. त्यामुळे येथे पक्ष बळकटीसाठी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी परिश्रम घेत आहेत, असे बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
बेळगावात बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. हेब्बाळकर म्हणाल्या, येत्या 8 महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. तिन्ही राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यावेळच्या निवडणुकीत लोकांना आमच्याकडे वळविण्यात आम्ही यशस्वी होऊ. त्यासाठी लोकांना समजावून सांगत आहोत. कर्नाटकातच काँग्रेसने पुन्हा एकदा भरारी घ्यावी असा आमचा उद्देश आहे. सतीश जारकीहोळी सौंदत्तीतून निवडणूक लढविणार का याबाबत मला माहिती नाही. पण तो मतदारसंघ मूळचा काँग्रेसचाच आहे. तेथे आम्ही जिंकण्याचा निर्धार केला आहे. आमचे कार्याध्यक्ष तेथे पक्ष तळागाळापासून मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपच्या ऑपरेशन कमळबाबत बोलताना या. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, भाजप सरकारच्या काळात लोकशाहीचे अवमूल्यन केले जात आहे ही बाब देशात सगळ्यांनाच ठाऊक झाली आहे. त्यामुळे लोकशाहीत आम्ही सुरक्षित नाही अशी भावना होत आहे. तसे असेल तर भाजपने निवडणूक घ्यावीच का?, आधी निवडणूक घ्यायची आणि नंतर घोडेबाजार करायचा हे भाजपचे तंत्रच बनले आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा विरोधकांच्या पाठी लावून हैराण करण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले आहे. महाराष्ट्रात दोलायमान राजकीय परिस्थिती असताना संजय राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली. भाजप डोळे मिटून दूध पिणार्या मांजराची भूमिका बजावत आहे. युवकांनी त्यांचा हा कावा ओळखला पाहिजे. भाजप लोकशाही व्यवस्था धुळीस मिळवत असल्याबद्दल जागृती केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
याचवेळी अटल बिहारी वाजपेयी यांची स्तुती करून आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपच्या ऑपरेशन कमळबाबत मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली. वाजपेयी यांचे राजकारण आम्हाला आदर्श होते. ते इंदिरा गांधी यांनादेखील मान देत होते. सरकार बनवण्यासाठी बहुमतासाठी केवळ एक मत कमी पडूनदेखील ते सन्मानाने बाहेर पडले होते अशी आठवण त्यांनी सांगितली.
Check Also
१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे
Spread the love बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू …