Saturday , October 19 2024
Breaking News

लाखो रुपयांचा चुना लावून फरारी ठकसेनाला बेळगाव पोलिसांकडून अटक

Spread the love

बेळगाव : बेळगावातील होलसेल भाजी व्यापार्‍यांना सिमेंट आणि लोखंडाच्या धंद्यात पैसे दामदुप्पट करून देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या ठकसेनाला बेळगाव पोलिसांनी नेपाळला जाऊन माहिती मिळवून बेड्या ठोकल्या आहेत.
एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने एका बड्या ठकसेनाला बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. बेळगावातील घाऊक भाजी व्यापार्‍यांना सिमेंट व लोखंडाच्या व्यवसायात पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना चुना लावणार्‍या ठकसेनाला त्यांनी अटक केली आहे. नेपाळला जाऊन त्याची माहिती गोळा करून मुंबईत शिवानंद दादू कुंभार याला बेळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
शिवानंद कुंभारने सिमेंट व लोखंडाच्या धंद्यात गुंतवणूक करण्याचे सांगून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 75 लाख रुपयांहून अधिक रक्कम उचलली होती. आधी त्याने काहींना दुप्पट पैसे दिले. त्यामुळे अनेक व्यापार्‍यांनी विश्वासाने त्याच्याकडे पैसे दिले. त्यानंतर नफाही नाही अन् गुंतवलेले पैसेही मिळाले नाहीत म्हणून व्यापारी अस्वस्थ झाले होते. या प्रकरणी जाफरवाडी येथील अर्जुन कल्लाप्पा पाटील यांनी बेळगावच्या सीईएन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पैसे परत करावे लागतील म्हणून मग शिवानंद कुंभारने कुटुंबासह परदेशात पळ काढला होता. त्याने मालदीव, इजिप्त, दुबई आदी देशात फिरून अखेर नेपाळमध्ये वास्तव्य केले होते. या संबंधी माहिती मिळताच बेळगाव पोलिसांकडून भारतीय दूतावास आणि इंटरपोलच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यासाठी नेपाळ पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. याच दरम्यान कुंभार मुंबईला येत असल्याची माहिती मिळताच एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या नेतृत्वाखालील बेळगाव पोलिसांच्या पथकाने मुंबईला जाऊन 26 जून रोजी शिवानंद कुंभारला बेड्या ठोकल्या. त्याला बेळगावला आणून चौकशी करण्यात येत आहे. गुंतवणूकदारांना फसवून शिवानंदने काही ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली.
एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या नेतृत्वाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील, सीईएन सेलचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर, काडय्या चरलिंगमठ, महेश वडियर व सहकार्‍यांनी महाठक शिवानंद कुंभार याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *