हुबळी : ‘सरळ वास्तू‘चे जगप्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.होय, ‘सरळवास्तू’ या वास्तुशास्त्र मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले प्रख्यात वास्तुतज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची आज मंगळवारी हुबळीतील उणकल परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मारेकरी फरारी झाले.
भक्तांच्या वेशात आलेल्या मारेकऱ्यांनी चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करून पळ काढल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. सरळ वास्तू संस्थेच्या माध्यमातून चंद्रशेखर गुरुजी नावारूपाला आले होते. या माध्यमातून यांनी अनेकांना मार्गदर्शन करून वास्तुविषयक समस्या सोडविल्या होत्या. वास्तुशास्त्रावर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. याशिवाय टीव्हीवर सरळ वास्तू नामक त्यांचे अनेक कार्यक्रमही प्रसारित झाले आहेत. कर्नाटकाबरोबरच महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यात चंद्रशेखर गुरुजींनी वास्तू मार्गदर्शक म्हणून ख्याती मिळवली आहे.