बैठकीत विकास योजनावर चर्चा
बंगळूर : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा मंदिराचा २६ कोटी रूपये खर्च करून विकास करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बैठक घेऊन चर्चा केली.
विधानसौध येथे मुख्यमंत्र्यांच्या दालनात सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी, मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांची बैठक घेऊन मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी निर्देश दिले. मंदिरात निवासासाठी ४०० खोल्या बांधण्यात येणार असून आणखी २०० खोल्या वाढवाव्यात, अशी सूचना त्यांनी केली. अन्नदासोह केंद्र निवासी समुदायांतर्गत सुरू करण्यात यावे, असे ते म्हणाले.
एक लाख २० हजार चौरस फुटांचे गृहसंकुल, स्नानगृह, शौचालयाचे बांधकाम, मंदिरात दोन स्वतंत्र रांगा तयार करण्यात याव्यात, त्यापैकी एका रांगेत विशेष दर्शनासाठी परवानगी द्यावी, मंदिराच्या आजूबाजूला तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था आणि फूटपाथ विकसित करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली.
मंदिराच्या साफसफाईसाठी कामगारांची कंत्राटी पध्दतीने नेमणुक करावी, व्यापाऱ्यांना स्वतंत्र दुकानांची व्यवस्था करावी, आदी सूचना करून २० जुलै रोजी सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी यांच्या नेतृत्वाखाली दुसरी बैठक घेऊन अंतिम अहवाल सादर करण्यास सांगितले.