बंगळूर : कर्नाटकातील सरकारी पदवीपूर्व (पीयु) महाविद्यालयातील अतिथी व्याख्यात्यांच्या मानधनात सुधारणा केल्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला असून, त्यांच्या मानधनात नऊ हजार रुपयावरून १२ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
पदवीपूर्व शिक्षण विभागाने सांगितले की, चालू वर्षात व्याख्यात्यांची कमतरता दूर करण्यासाठी तीन हजार ७०८ अतिथी व्याख्याते भरले जात आहेत. याबाबतची माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये, पदोन्नती, सेवानिवृत्ती, मृत्यू आणि इतर कारणांमुळे विविध विषयांच्या रिक्त पदांवर एकूण तीन हजार ७०८ अतिथी व्याख्यात्यांची भरती करणे आवश्यक आहे.
राज्य सरकारी पूर्वपदवी महाविद्यालयातील रिक्त अध्यापन पदांच्या बदल्यात चालू वर्षात ३५०० हून अधिक अतिथी व्याख्यात्यांना नियुक्त करण्याचा आणि त्या शिक्षकांचे मानधन ९,००० रुपयांवरून १५,००० रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव पदवीपूर्व शिक्षण विभागाने सरकारला सादर केला होता.
पदवीपूर्व शिक्षण विभागाचे संचालक आर. रामचंद्रन यांनी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे प्रधान सचिव सेल्वकुमार यांना २०२२-२३ मध्ये सरकारी पीयु महाविद्यालयांमध्ये ३,५०० हून अधिक अतिथी व्याख्यात्यांची नियुक्ती करण्याचा आणि त्यांचे मानधन १५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला.
कल्याण कर्नाटकासाठी आनंदाची बातमी
शिक्षण क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी सरकार १५ हजार नवीन शिक्षकांची भरती करत आहे, त्यापैकी पाच हजार शिक्षक कल्याण कर्नाटक भागात देण्यात येणार आहेत, असे प्राथमिक मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.
मंगळवारी देवदुर्ग तालुक्यातील अरकेरी गावातील आदर्श विद्यालयात राबविण्यात आलेल्या पर्जन्य जलसंचयन प्रकल्पाचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, कल्याण कर्नाटकात शिक्षकांची कमतरता आहे. त्यावर मात करण्यासाठी शिक्षक भरती सुरू करण्यात आली आहे. ते म्हणाले की, शिक्षकांची प्रदेशाबाहेर बदली केली जाणार नाही कारण स्थानिकांची ३७१ (जे) आरक्षणानुसार भरती केली जाते.
गेल्या वर्षी कोविडमुळे शाळा व्यवस्थित चालत नव्हत्या ज्यामुळे मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम झाला, त्यामुळे सध्याच्या शैक्षणिक वर्षात शिकण्याच्या पुनर्प्राप्तीवर अधिक भर दिला जात आहे. लर्निंग रिकव्हरी अभ्यासक्रम शिकवल्यानंतरच पाठ्यक्रम शिकवला जाईल, असे ते म्हणाले.