कॉंग्रेसच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा, १३२ कोटी अनुदान मंजूर
बंगळूर : सरकार सरकारी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला शूज आणि मोज्यांचे दोन जोड वितरित करेल, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी जाहीर केले. सरकारने विद्यार्थ्यांना अद्याप बूट, सॉक्स वितरित केले नसल्याबद्दल कॉंग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला केल्यानंतर सरकारने हा निर्णय जाहीर केला.
२०२२-२३ च्या अर्थसंकल्पात यासाठी कोणताही निधी राखून ठेवला नव्हता. त्यामुळे शाळकरी मुलांना शूज आणि मोजे पुरविण्याबाबत बोम्मई प्रशासन अनिर्णित असल्याबद्दल विरोधी पक्षाने जोरदार टीका केली.
त्यावर मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, की आज मी शूज आणि सॉक्ससाठी १३२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आम्ही त्यांना देऊ. यावर संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही, असे बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले. जेव्हा गणवेशाचा प्रश्न येतो तेव्हा सरकारने याला आधीच मान्यता दिली आहे. गणवेश तयार केले जात आहेत. ते लवकरच विद्यार्थ्यांना वितरित केले जातील, असे ते म्हणाले.
शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री बी. सी. नागेश यांनी मुलं शूज आणि मोजे घालण्यासाठी शाळेत येत नाहीत, असं सांगितल्यानंतर काँग्रेसनं भाजप सरकारवर निशाणा साधला होता.
मोफत शूज आणि मोजे वाटप करण्याच्या योजनेला २०१५ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. कर्नाटकातील सरकारी शाळांमध्ये ५० लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत.
… तर शूज, सॉक्ससाठी भीक मागू – शिवकुमार
बोम्मई यांनी घोषणा करण्यापूर्वी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले होते, की मी भीक मागून शूज आणि सॉक्ससाठी पैसे उभे करेन. सरकारने यासाठी पैसे नाहीत म्हणून सांगावे. कर्नाटकचे लोक दयाळू आहेत. मी त्यांच्याकडे पैसे मागेन. मी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत देखील योगदान देईन आणि पैसे मिळवेन, असे शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले.
मुले शाळेत शूज आणि मोजे घालण्यासाठी येत नाहीत, असे म्हणणाऱ्या शिक्षण मंत्री नागेश यांना अक्कल नाही. आपल्या मुलांना चांगले बूट आणि मोजे मिळावेत अशी पालकांची इच्छा असते. मुलांसाठी शूज आणि मोजे आवश्यकता नाही म्हणणारे नागेश चांगले कपडे का घालतात? असा प्रश्न करून त्याना लंगोटीवर फिरू द्या. बघूया, असे ते म्हणाले.