बेंगळुर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उडुपी दौर्यादरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि विविध अधिकार्यांची बैठक घेतली.
उडुपी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध अधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात अडकलेल्या उडुपी जिल्ह्यातील अनेक नुकसानग्रस्त भागांना भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, कोडगू येथे उद्भवलेल्या पूर परिस्थितीची पाहणी आपण केली आहे. तसेच तेथील नुकसानग्रस्त भागाला आणि नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आजच्या बैठकीत समुद्र परिसरात सुरु असलेल्या तातडीच्या तसेच दीर्घकालीन कामकाजांसंदर्भात लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांशी चर्चा करून सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या दौर्यात लवकरच आपण उत्तर कन्नड आणि बेळगावला भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री आर. अशोक, सी. सी. पाटील, कोटा श्रीनिवास पुजारी, एस. अंगारा, प्रादेशिक आयुक्त प्रकाश जीएस, मुख्यमंत्र्यांचे सचिव जगदीश, दक्षिण कन्नड, उडुपी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.