Saturday , October 19 2024
Breaking News

मोदी सरकारची देशात हुकूमशाही : एम. बी. पाटील

Spread the love

 

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आयटी, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देत आहेत. देशातील मोदी सरकार हुकूमशाही राबवत आहे, असा आरोप काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष एम बी पाटील यांनी केला.
बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप सरकारवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आयटी, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षांना त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशभरात याविरोधात निषेध व्यक्त होत असून आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये याविरोधात आंदोलन सुरु असल्याचे ते म्हणाले. नेहरू आणि गांधी घराण्याचा इतिहास मोठा असून या कुटुंबाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे. नॅशनल हेराल्ड हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेले वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून देशातील जनतेला संदेश देण्यात येत होता. यानंतर हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत आले. काँग्रेसकडून आलेल्या 90 कोटी रुपये निधीचा वापर वृत्तपत्र कर्मचार्‍यांसह इतर खर्चासाठी वापरण्यात आला. मात्र याबाबत एकही एफआयआर दाखल नाही. परंतु आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना त्रास देण्याचे काम सुरु असून हि भाजपाची हुकूमशाही असल्याचा आरोपही एम. बी. पाटील यांनी केला. यानंतर बोलताना भाजप सरकारच्या कमिशन प्रकरणासंदर्भात देखील त्यांनी टीका करत, कर्नाटकातील कंत्राटदाराने पंतप्रधानांना पत्र लिहूनही सदर नेत्यावर आयटी, ईडी, सीबीआय धाड टाकण्यात आली नाही, अशी टीकाही त्यांनी केली. भाजप राष्ट्रीय पक्षाकडून काँग्रेसला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र याला काँग्रेस कदापिही घाबरणार नाही. भाजपकडून होणार्‍या द्वेषाच्या राजकारणाचा काँग्रेस निषेध करत असल्याची प्रतिक्रिया एम. बी. पाटील यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना एम. बी. पाटील म्हणाले, ‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन देणार्‍या मोदींनी नोकरीचे आश्वासन दिले. परंतु आता जनतेला दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. जीएसटीमधून तांदूळ आणि दूध देखील सोडले नाही. जनता मेली तरी चालेल परंतु जीएसटी द्यावीच, जनता जगूही शकत नाही आणि मरूही शकत नाही अशी परिस्थिती भाजप सरकारने आणली आहे. दुसरीकडे अदानी आणि अंबानींसारखे उद्योगपती मोठेच होत आहेत. मात्र देशाची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. आता जनता असे अच्छे दिन आपल्याला नको असल्याचा टाहो फोडत असल्याचे एम. बी. पाटील म्हणाले.
राज्यातील बेकायदेशीर घडामोडींवर देखील एम. बी. पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून पोलीस भरती, संतोष पाटील प्रकरणात मंत्री ईश्वरप्पा यांना देण्यात आलेली क्लीन चिट, अग्निपथ योजना या सार्‍यांवर त्यांनी टीका केली. भाजपचे हे वाईट सरकार जाऊन पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार येईल, आणि भाजपकडून होणार्‍या ईडी, आयटी, सीबीआय धाडींना काँग्रेस कदापिही घाबरणार नाही, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला माजी मंत्री विनय कुलकर्णी, आमदार अंजली निंबाळकर आदींसह इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *