बेळगाव : वडगाव सोनार गल्ली कॉर्नर येथील दारू दुकान इतरत्र हलविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. येथील सचिन वाईन शॉप नामक दारू दुकानामुळे परिसरातील व्यावसायिकांना दारू पिण्यासाठी येणाऱ्यांकडून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या दुकानात दारू पिण्यासाठी येणाऱ्या मद्यपी दारू पिण्यासाठी येतात व रस्त्यावर थांबून चर्चा करतात. दारूच्या नशेत जोरात ओरडणे, प्रसंगी मारामारी करणे तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, युवतींची छेड काढणे, क्षुल्लक कारणावरून मारामारी करणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर या भागातील व्यावसायिकांच्या कट्ट्यावर बसून गुटखा खाऊन थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, विवस्त्र झोपणे असे प्रकार घडत आहेत.
या दुकानाला फक्त दारू विक्रीचा परवाना आहे मात्र हा दुकानदार दारू पिण्यासाठी देतो त्यामुळे येथे चोरून दारू पिणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. हे तळीराम दारू पिण्यासाठी जाताना आजूबाजूच्या दुकानासमोर गाडी पार्क करतात व त्या व्यावसायिकांनी रस्ता सोडून गाडी लावण्याची विनंती केली तरी हुज्जत घालतात. त्यामुळे मध्यवस्तीत असलेले हे सचिन वाईन शॉप नामक दुकान दुसरीकडे हलविण्यात यावे अशी मागणी या भागातील व्यावसायिक व महिला वर्ग करीत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे दारू दुकान त्वरित बंद करावे.