बेळगाव : राज्यातील आगामी निवडणुकीत काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी मास्टरप्लॅन आखला आहे. केवळ बेळगाव दक्षिण मतदारसंघ हे आमचे लक्ष्य नाही. सौंदत्ती, रायबाग, हारुगेरी या सर्व मतदारसंघात पक्षसंघटना मजबुतीच्या उद्देशाने बैठका घेतल्या जात आहेत, असे केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव येथील दक्षिण मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीला रविवारी आले असता, आ. सतीश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उमेदवार कोण आहे ते नंतर पाहू, आधी पक्ष बळकट करू. व्होट बँक तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश लोकांना सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील 18 मतदारसंघात पक्षाचे संघटन बळकट करणार आहोत. दक्षिण मतदारसंघातील मताधिक्य वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पाया मजबूत असेल तर उमेदवार निवडून येईल. बेळगाव दक्षिण मतदारसंघात पराभूत झालेले उमेदवार वेगवेगळे आहेत. येथील तीन निवडणुकांमध्ये वेगवेगळे उमेदवार लढले आहेत असे जारकीहोळी म्हणाले. त्याच वेळी, त्यांनी पक्षाध्यक्ष बदलाच्या चर्चेवर भाष्य करताना जारकीहोळी यांनी, सध्या पक्षाध्यक्ष बदल होणार नाही. महानगर काँग्रेसचे अध्यक्ष बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांना आधीच सांगितले आहे. तुम्ही बेळगाव उत्तर मतदारसंघाची काळजी घ्या. बेळगाव दक्षिण मतदारसंघाची जबाबदारी आम्ही घेऊ, असे सांगितले आहे. याबाबत पक्षाच्या व्यासपीठावरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार जमीर अहमद खान यांना नोटीस जारी करण्यासंदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले, “हा मुद्दा आमच्याशी संबंधित नाही. राजकारण म्हटले की, तिथे गोंधळ असतोच असतो. प्रत्येकजण पक्षात आपले विचार मांडण्यास मोकळा आहे. भावी मुख्यमंत्री कोण हे आताच सांगणे कठीण आहे. आम्ही म्हणतो व्यक्तीपूजा करू नका, पक्षाची पूजा करा. सिद्धरामोत्सवापासून पक्षाला बळ मिळेल, यात गोंधळाचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.
जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, चिक्कोडी काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी आमदार रमेश कुडची, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.