मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची कारवाई
कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जी यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून हटवले आहे. ईडीच्या अटकेनंतर पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी होत होती. दरम्यान, आज ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर काही वेळातच त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याचे आदेश जारी करण्यात आले.
पार्थ चॅटर्जी हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये उद्योग, वाणिज्य आणि उपक्रम, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री होते. केंद्रीय एजन्सी ईडीने 23 जुलै रोजी त्याला अटक केली होती. एजन्सीने अर्पिता मुखर्जीच्या अटकेपूर्वी तिच्या घरातून सुमारे 21 कोटी रुपये जप्त केले होते.
अर्पिता मुखर्जी ही टीएमसी नेते पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची मानली जाते. बुधवारीही ईडीने मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत 29 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एजन्सीने अनेक मालमत्तेची कागदपत्रे आणि तीन किलो सोनेही जप्त केले आहे.
सरकारी शाळा आणि अनुदानित शाळांमधील कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या वेळी पार्थ चॅटर्जी हे शिक्षण विभागाचे प्रभारी होते. नंतर हा विभाग त्यांच्याकडून काढून घेतला गेला. शालेय सेवा आयोगाकडून शिक्षक भरतीमध्ये कथित अनियमिततेच्या आरोपांची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करत आहे.