बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत चालला आहे. सीमावाद खटला सर्वोच्च न्यायालयात निर्णायक वळणावर आला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, जतसह 40 गावांवर दावा केलाय. सीमावादावरून शिंदे सरकारला विरोधकांनी घेरले होते. आज कर्नाटकचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अहमदाबाद विमानतळावर भेट झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
सीमावादावरून दोन्ही राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. बोम्माई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर आपला हक्क सांगितला आहे तर काही गावे स्वतःहून कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहेत. सीमावाद न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे, असे असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा वाद पुन्हा उकरून काढलाय. या सगळ्या घडामोडींदरम्यान दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची झालेली भेट ही महत्त्वाची मानली जाते.