बेळगाव : बेळगाव येथील सुवर्ण विधान सौधजवळ सरकारी वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची खोटी तक्रार बेंगळुरू येथील कृषी ग्रामीण विकास बँकेच्या चालकाने दिल्याच्या घटनेचे सत्य पोलिसांनी उघड केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चेतन एन. व्ही. हे कृषी ग्रामीण विकास बँकेच्या चामराजपेट, बेंगळुरूच्या चालक आहेत. हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते बुधवारी सकाळी ७.४५ वाजता बँकेच्या बोलेरो वाहनाने बेळगावकडे निघाले. सायंकाळी ४.३० च्या सुमारास शिग्गाव तालुक्यातील तडासाजवळील बारमध्ये त्यांनी दारू प्राशन केली. तेथून येत असताना त्यांच्या गाडी स्टील सळ्यांनी भरलेल्या लॉरीला धडकली. यामध्ये बोलेरो वाहनाच्या डाव्या बाजूच्या खिडकीच्या काचा फुटल्या. मात्र वरिष्ठ अधिकारी रागावतील म्हणून त्यांनी अज्ञातांनी काच फोडली असा बनाव करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. याची गांभीर्याने दखल पोलिस प्रशासनाने घेतली.
आपला अपघात लपविण्यासाठी मराठी भाषिकांवर दगडफेक केल्याचा खोटा आरोप करणाऱ्या चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रवींद्र गडादी यांनी सदर हिरेबागेवाडी टोल नाक्यावरचा सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना दिले आहे. अनेकांनी तर सदर दगडफेक मराठी भाषिकांनी केल्याचा संशय व्यक्त केला होता मात्र पोलिसांनी टोल नाक्यावरील सदर गाडीचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने दगडफेक नव्हे तर अपघातात हिरेबागेवाडीत दाखल होण्यापूर्वी गाडीची काच फुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे.