नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि त्याआधी यंदा सत्तेची उपांत्य फेरी मानल्या जाणाऱ्या दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीत 35 केंद्रीय मंत्री, 12 राज्याचे मुख्यमंत्री, 37 राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चार वाजता सुरू होणाऱ्या बैठकीपूर्वी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यामध्ये कार्यकारिणीत मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षीय भाषणाने होईल आणि पंतप्रधान मोदींच्या भाषणाने बैठक संपणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडला जाणार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर स्वतंत्र चर्चा होणार आहे. त्रिपुरा, नागालँड, मेघालय, कर्नाटक, मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी बहुतांश राज्यांमध्ये भाजप किंवा त्यांचे मित्रपक्ष आहेत
भाजपची ताकद नसलेल्या मतदारसंघासाठी रणनीती ठरणार आहे. या बैठकीत राजस्थान, छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्तेवर येण्यावर गंभीर चर्चा होणार आहे. विशेषत: छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांकडे केंद्रातील सत्तेची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे.