विजयपूर : ऐतिहासिक विजयपूर शहरात दि. 9 व 10 डिसेंबर रोजी आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय पत्रकार संमेलन भूमीवरील चालता बोलता देव लिंगैक्य श्री सिद्धेश्वर स्वामींच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. ते संमेलन दि. 4 व 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवानंद तगडूर यांच्या नेतृत्वाखाली विजयपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी बेंगळुरू येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निमंत्रण दिले.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, श्री सिद्धेश्वर स्वामींच्या सानिध्यात होणारे हे संमेलन त्यांच्या अनुपस्थितीत होणार त्याबद्दल असमाधान व्यक्त करुन, अत्यंत शिस्तबद्ध व अर्थपूर्णरित्या संमेलन पार पाडावे अशी सूचना दिली.
या प्रसंगी विजयपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संगमेश चुरी, मुख्य सचिव मोहन कुलकर्णी, राज्य समितीचे सदस्य डि. बी. वडवडगी, सह खजिनदार दिपक शिंत्रे, अल्लमप्रभू मल्लिकार्जुनमठ उपस्थित होते.
दि. 4 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते 37 व्या राज्य पत्रकार संघाचे संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार असून, दि. 5 फेब्रुवारी रोजी समारोप समारंभास विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या हे उपस्थित राहणार आहेत.