बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होणारं आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांची चर्चा केली असल्याचे समजते. पवार यांनी या निवडणुकीत पूर्ण लक्ष घालणार असल्याचे सांगितले असून समितीनेही प्रत्येक मतदारसंघात एकेक उमेदवार देण्यात येईल अशी ग्वाही दिली असल्याचे कळते.
महाराष्ट्र एकीकरण समितीने लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे. प्रत्येक मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत. उमेदवार निवडीची प्रक्रिया आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जाहीर होईल असे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे समितीच्या उमेदवार निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर आणि खानापूर या मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने तयारीने उतरण्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी समिती नेत्यांशी फोनवर संपर्क साधून सीमा भागातील हालचालींबाबत माहिती घेतली. या निवडणुकीत समिती उमेदवारांनी विजय संपादित करावा. दोन-दोन उमेदवार जाहीर करण्यात येऊ नये. याबाबतही त्यांनी सूचना केल्याचे कळते. समितीच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पाठबळ देईल असेही पवार यांनी सांगितले असल्याचे समजते.