नवी दिल्ली : “देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण अमर होतात. 28 मे हा असाच एक दिवस. ही केवळ एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशाला आज नवीन संसद भवन मिळालं. नवीन संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं पहिल भाषण केलं. “नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरुन येतो. या वास्तूमध्ये वारसा, वास्तुकला, कला आणि कौशल्य आहे. यामध्ये संस्कृती आहे तसंच संविधानाचा आवाज आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आजचा दिवस देशासाठी शुभ आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अमृत महोत्सवात भारतातील जनतेने संसदेची ही नवी इमारत आपल्या लोकशाहीला भेट म्हणून दिली आहे. आज सकाळी संसद भवन संकुलात सर्वधर्मीय प्रार्थना झाली, भारतीय लोकशाहीच्या या सुवर्ण क्षणासाठी मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो.
लोकशाही हे आपले संस्कार, कल्पना आणि परंपरा आहे: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत हा केवळ सर्वात मोठी लोकशाही असेलला देश नाही तर लोकशाहीची माताही आहे. जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हा आपला ‘संस्कार’, विचार आणि परंपरा आहे.
ही नवी वास्तू आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने साकार करण्याचे साधन बनेल. ही नवीन इमारत आत्मनिर्भर भारताचा सूर्योदय पाहणार आहे. या नवीन इमारतीमुळे विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता होणार आहे.
संसदेची नवीन इमारत पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो : पंतप्रधान
संसदेची नवी इमारत या प्रयत्नांचे जिवंत प्रतीक बनली आहे. आज नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. या वास्तूमध्ये वारसा, वास्तुकला, कला आणि कौशल्य आहे. यामध्ये संस्कृती आहे तसेच संविधानाचा आवाज आहे. लोकसभेचा आतील भाग हा राष्ट्रीय पक्षी मोरावर आधारलेला दिसतो. राज्यसभेचा भाग हा राष्ट्रीय फूल कमळावर आधारित आहे आणि राष्ट्रीय वृक्ष वट देखील संसदेच्या प्रांगणात आहे. आपल्या देशाच्या विविध भागांतील विविधतेचा या नव्या इमारतीत समावेश करण्यात आला आहे.
आपलं संविधान हाच आपला संकल्प : पंतप्रधान मोदी
आपलं संविधान हाच आपला संकल्प असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जो थांबतो, त्याचे नशीबही थांबते. जो चालत राहतो, त्याचे नशीबही चालत असते. म्हणूनच चालत राहा. गुलामगिरीनंतर आपल्या भारताने खूप काही गमावून आपला नवा प्रवास सुरु केला. या प्रवासाने अनेक चढउतारांवरुन, अनेक आव्हानांवर मात करत स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात प्रवेश केला आहे.
चोल साम्राज्यात राजदंड हे कर्तव्य, सेवा मार्गाचे प्रतीक : मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, चोल साम्राज्यात या राजदंडला कर्तव्य, सेवा, राष्ट्रीय मार्गाचे प्रतीक मानले जात होतं. राजगोपालाचारीजींच्या मार्गदर्शनाखाली हा राजदंड सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक बनलं. तामिळनाडूहून खास आलेले अध्यानमचे पुरोहित आज सकाळी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी संसदेत उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पवित्र राजदंडाची स्थापना करण्यात आली.
नव्या वाटांवर चालल्यानेच नवे विक्रम प्रस्थापित होतात : मोदी
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटलं की, नवीन विक्रम हे नवीन मार्गांवर चालल्यानेच निर्माण होतात. नवा भारत नवीन उद्दिष्टे ठरवत आहे. नवा उत्साह आहे, नवा प्रवास आहे. नवा विचार, नवी दिशा, नवी दृष्टी, नवीन संकल्प, नवीन विश्वास आहे.