नवी दिल्ली : राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व अशी फूट पडली आहे. अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या कार्यकरणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस.आर. कोहली यांना पक्षातून निलंबित केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या बैठकीवर अजित पवारांनी आक्षेप घेतला असून बैठक बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. अजित पवार यांनी आज दिल्लीतील शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस हरकत घेतली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे याचिका आधीच दिली आहे.
मुंबईमध्ये बैठक घेतल्यानंतर शरद पवार यांनी दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठक बोलावली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, वंदना चव्हाण, सोनिया दुहान, धीरज शर्मा, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैसल, एस. के. कोहली, योगानंद शास्त्री आणि व्ही. पी. शर्मांसह अन्य मोठे नेते उपस्थितीत होते. या बैठकीमध्ये अजितदादांनी केलेल्या बंडावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीच्या सध्याच्या पेचप्रसंगानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे. आज राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्यावर विश्वासदर्शक ठराव मंजूर केला आहे.
शरद पवार यांच्या नेत्यांना पदावरून हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीने पाठिंबा दिला आणि मंजुरी दिली आहे. या ठरावानुसार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि 9 आमदारांना बडतर्फ करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि एस. आर. कोहली यांना निलंबित करण्याचा ठराव मांडण्यात आला. अध्यक्ष शरद पवार यांनी या ठरावाला मंजुरी दिली आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कार्यकारिणीची विनंती केली आहे.