बेळगाव : बेळगांव येथील कॅपिटल-वन या संस्थेच्यावतीने अखिल भारतीय स्तरावरील भव्य खुल्या मराठी एकांकिका लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मराठी एकांकिका लेखन स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रु. 11000/-, रु. 7000/- आणि रु. 5000/- मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
अशी माहीती संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव हंडे यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. सहकार क्षेत्रात कॅपिटल वन ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. आर्थिक क्षेत्रात संस्थेने आपला वेगळा असा ठसा उमटवीतच सांस्कृतिक क्षेत्रात देखील उल्लेखनीय कार्य केले आहे.
ही संस्था अनेक वर्षे सातत्याने आंतरराज्य स्तरावर एकांकिका स्पर्धांचे यशस्वी आयोजन करीत आहे. नवनवीन कलाकार, लेखक, दिग्दर्शक निर्माण व्हावेत या उदात्त हेतू बरोबरच शहराच्या नाट्यपरंपरेला उर्जीत अवस्था देण्याचे कार्य या संस्थेने आजवर केले आहे.
सातत्याने बालनाट्यासाठी घेत असलेल्या संहितांचा तुटवडा लक्षात घेऊन सर्व मराठी लेखकांसाठी खुल्या असलेल्या या एकांकिका लेखन स्पर्धेमध्ये केवळ बालनाट्यासाठी मुलांचे भावविश्व व मानसिकता लक्षात घेऊन त्यांना पोषक असलेल्या संहीतांचा समावेश करण्यात येणार असून लेखकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठीचे नियम आणि अटी ekankikacapitalone@gmail.com या संकेत स्थळावर विनंती करुन मिळविता येतील अथवा https://www.facebook.com/capitalone.in/ या फेसबुक पेजवर जाऊन डाऊनलोड करून घेता येतील. अधिक माहीतीसाठी संस्थेच्या 9343649005 अथवा 9343649006 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
प्रवेश अर्ज व संहिता स्विकारण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2024 आहे. दरम्यान सालाबादाप्रमाणे कॅपिटल -वन संस्थेतर्फे यंदाही आंतरराज्य भव्य एकांकिका स्पर्धांचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे.