बेळगाव : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एक अजातशत्रू होते. एक राजकारणी, एक व्यक्ती कसा असावा हे त्यांनी आपल्या जीवन कार्यातून दाखवून दिलं, असे विचार भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी व्यक्त केले.
विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात किरण जाधव बोलत होते.
अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी राजकारणाला समाजकारणाचे स्वरूप देताना केवळ लोकहित आणि देशहित यालाच प्राधान्य दिले, असे किरण जाधव म्हणाले.
रस्ते जोडणी प्रकल्पा असो किंवा पोखरणची अणुचाचणी, त्यांनी असाध्य अशी कामे साध्य करून दाखविली. जय जवान आणि जय किसान या नाऱ्याबरोबरच त्यांनी जय विज्ञान चा नारा दिला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवा पिढीने राजकीय क्षेत्रात कार्यरत राहावे असेही किरण जाधव म्हणाले.
किरण जाधव यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना वंदन केले. यावेळी विमल फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.