मृतदेह दवाखान्यासमोर ठेवून रयत संघटनेचे आंदोलन ; १ कोटी रुपये भरपाईची मागणी
निपाणी (वार्ता) : राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील त्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळेच हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव तालुक्यातील शाबाज मधील शेतकरी चंद्रप्पा चंद्रापूर यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये व त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी मिळवून द्यावी, या मागणीसाठी बंकापूर येथील शासकीय रुग्णालयासमोर मृतदेह ठेवून कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली एम.एन. नायक, चुन्नाप्पा पुजारी, मुथु गुड्डीगेरी व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
राजू पोवार म्हणाले, सरकारने राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत. पण आज तागायात सर्वे अथवा नुकसान भरपाई मिळालेली नाही. या उलट साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिक नुकसान भरपाईची सवय लागली आहे, असे शेतकऱ्याविरोधी विधान केले आहे. याशिवाय अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून भरपाई अथवा कर्जमाफी न झाल्याने शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. या पुढील काळात शेतकऱ्यांनी आपल्या समस्या संदर्भात कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटल्यास समस्या सोडविण्यात येईल. रयत संघटना या कामासाठी नेहमीच प्रयत्नशील शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यासह त्यांच्या वारसाला सरकारी नोकरी द्यावी, अन्यथा रयत संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
शवविच्छेदनानंतर रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर शासकीय रूग्णालय आवारात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर मृतदेह कार्यकर्त्यांनी ताब्यात घेऊन शेतकऱ्याचा अंत्यविधी पूर्ण केला. यावेळी संगमेश प्रीतांमपुर, चिनाप्पा मुरडूर, भुवनेश्वर शिडलपूर, जगदीश बळ्ळारी, शेखरप्पा हलसूर यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.