बेळगाव : बेळगावचा शेतकरी कधी अस्मानी संकटांशी तर कधी सुलतानी संकटांशी झुंजत आहे. त्यात भरीस भर म्हणून की काय दलालांनी परराज्यातील भाजीपाला, कडधान्ये आणून बेळगाव ब्रँडच्या नावाखाली बाजारपेठेत विकू पहात आहेत. त्याचेच प्रत्यय आज झाडशहापूर येथील शेतकऱ्यांना आले.
बेळगावचे मसूर, बासमती तांदूळ व इतर कडधान्ये जगप्रसिद्ध आहेत. स्थानिक बाजारपेठेत त्यांना बरीच मागणी आहे. याचाच फायदा बाहेरून आलेले दलाल घेत असतात. बेळगावजवळील झाडशाहापूर येथील गाजर देशात प्रसिद्ध आहेत. देशभरातील बाजारपेठेत बऱ्यापैकी मागणी देखील आहे. झाडशहापूर येथे स्थायिक असलेल्या दलालाने इंदूर येथून अल्पभावात गाजर आणून ती बेळगावची आहेत म्हणून भाजी मार्केटमध्ये विकण्याच्या तयारीत होता. परराज्यातून आलेली गाजर मार्केटमध्ये गेली तर तात्काळ भाव पडणार हे लक्षात येताच काही स्थानिक शेतकऱ्यांनी दलालाचे वाहन अडवून त्याला जाब विचारला. जर तू परराज्यातील गाजर आणून बेळगावच्या ब्रॅण्डखाली विकून स्थानिक शेतकऱ्याच्या पिकमालाचे भाव पडणार असशील तर आम्ही ते होऊ देणार नाही. आधीच स्थानिक शेतकरी दुष्काळाने होरपळाला आहे. त्यात अशापद्धतीने आमच्या मालाचा भाव पाडू नको असे म्हणत त्या दलाला धारेवर धरले तर चोराच्या उलट्या बोंबा म्हणत या दलालाने शेतकऱ्यांवरच दादागिरी केली व मी परराज्यातील माल मागवणार आणि बाजारात विकणार तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा म्हणून मोठ्या आवाजात बोलत असता शेतकरी आक्रमक झाले. ते पाहून सदर दलालाने नरमाईची भूमिका घेत यापुढे असे करणार नाही असे सांगितले आणि त्याला निर्वाणीचा इशारा देखील दिला.