भाजपचे राज्यभर अभियान सुरू
बंगळूर : कर्नाटकातील भाजपने गुरुवारी ‘मी देखील एक करसेवक आहे, मलाही अटक करा’ अशी मोहीम सुरू केली असून, रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित एक वर्ष जुन्या प्रकरणी एका हिंदू कार्यकर्त्याच्या अटकेवर राज्याच्या अनेक भागांमध्ये निदर्शने करण्यात आली.
बंगळुरमध्ये प्रचाराचे नेतृत्व करताना, आमदार आणि माजी मंत्री व्ही. सुनील कुमार यांनी सदाशिवनगर पोलिस स्टेशनजवळ भाजप कार्यकर्त्यांसह ‘जय श्री राम’च्या घोषणा देत धरणे आंदोलन केले.
‘मीही करसेवक आहे, मलाही अटक करा’ असा संदेश असलेले फलक हातात घेऊन कुमार म्हणाले, की आम्ही १९९२ मध्ये राम मंदिर आंदोलनातही भाग घेतला होता, त्यासाठी आम्हालाही अटक झाली पाहिजे. त्यानंतर पोलिसांनी त्याना प्रतिबंधात्मक कोठडीत घेतले.
भाजपचे वरिष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा आणि सी. टी. रवी यांनी अनुक्रमे शिमोगा आणि चिक्कमंगळूर या जिल्हा मुख्यालयात निदर्शने केली.
डिसेंबर १९९२ मध्ये दाखल झालेल्या दंगलीच्या गुन्ह्याच्या संदर्भात श्रीकांत पुजारी या कारसेवकाला पोलिसांनी गेल्या आठवड्यात उत्तर कर्नाटकातील हुबळी शहरात अटक केली होती. भाजपने काँग्रेस सरकार हिंदूंवर कठोर असल्याचा आणि अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. काँग्रेसने भाजपवर या प्रकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुजारी यांचे “संशयित गुन्हेगार’ म्हणून वर्णन केले आणि सांगितले की त्याच्यावर बेकायदेशीर दारू विक्री, जुगार आणि मटका यासह १६ प्रकरणामध्ये सामील असल्याचा आरोप केला आहे.
पत्रकारांशी बोलताना कुमार म्हणाले, “मीही करसेवक आहे, मलाही अटक करा’ ही मोहीम काँग्रेस सरकारच्या राम आणि हिंदूविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.”
ते म्हणाले की, त्यावेळच्या सरकारच्या धमक्यांना न जुमानता कर्नाटकातील हजारो लोक १९९० आणि १९९२ च्या अयोध्येतील ‘करसेवे’मध्ये सहभागी झाले होते. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसने करसेवक आणि रामभक्तांना धमकावण्याची रणनीती अवलंबली असल्याचा आरोप त्यांनी केला.
अटकेबद्दल सिद्धरामय्या सरकारची निंदा करताना कुमार म्हणाले, की हिंदू कार्यकर्त्याला गुन्हेगार म्हणून चित्रित केले जात आहे, परंतु मंगळुर कुकर स्फोटातील आरोपीला निर्दोष म्हटले जात आहे.
के. जे. हळ्ळी आणि डी. जे. हळ्ळी दंगल प्रकरणातील आरोपींना सोडवण्यासाठी काँग्रेस नेते सरकारला पत्र लिहित असल्याचा आरोप त्यांनी केला.