बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे “व्यसनमुक्त बेळगाव शहर” अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अमली पदार्थांविरोधात आज शहरात जनजागृती रॅली काढण्यात आला. अमली पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहिल्याने चांगले जीवन जगू शकता, असे शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी यावेळी सांगितले.
बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे आज, शुक्रवारी शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ मुक्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये बेळगावातील विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
चन्नम्मा चौकात रॅलीला चालना देताना पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा म्हणाले की, पोलीस विभागाने 1 महिन्यापासून शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली आहे. अमली पदार्थांचे व्यसन खूप घटक आहे. यात एकदा अडकल्यास बाहेर पडणे खूप कठीण असते. शालेय मुले, शिक्षक आणि पालकांनी मुलांना अंमली पदार्थ आणि व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगावेत. व्यसनांपासून दूर राहिल्यास आपण चांगले जीवन घडवू शकतो, व्यसनमुक्त शहर घडवूया, असे शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सांगितले. व्यसनमुक्ती बेळगाव रॅलीमध्ये पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, डीसीपी रोहन जगदीश, पीव्ही स्नेहा, एसीपी कोलकार, सदाशिव कट्टीमणी हातात अमली पदार्थांच्या विरोधात जागृती करणारे संदेश असलेले फलक घेऊन सहभागी झाले होते. शहरातील विविध पोलीस स्थानकांचे अधिकारी, हेड कॉन्स्टेबल तसेच शालेय विद्यार्थी, शिक्षक रॅलीत सहभागी झाले होते.