ठाणे : अवघ्या भारतवर्षाची प्रदीर्घ काळची प्रतीक्षा अखेर संपली. अयोध्येत राममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले. मंत्रघोषात प्रभू श्रीरामाचे गाभाऱ्यात विधिवत पूजन करण्यात आलं. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरातून मुख्यमंत्री शिंदेंनी तर नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाईव्ह सोहळा पाहिला. राममंदिराला लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळासह भेट देणार आहे. आजचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. ते ठाण्यत बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आजचं निमंत्रण खरं तर मलाही होतं. मात्र एकट्याने दर्शन घेण्याऐवजी अख्खं मंत्रिमंडळ दर्शनाला जाणार आहे. महाराष्ट्राचे अयोध्या आणि रामलल्लाचं एक वेगळं नातं आहे. आपल्याच महाराष्ट्रातील पंचवटीत त्यांचा वनवास होता. चंद्रपुरातून मंदिरासाठी लाकूड गेले आहे. आजचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. लवकरच संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येत जाऊन दर्शन घेणार आहे.
बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत, ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो,अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे, त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे. सर्वांनी या सोहळ्यात शामील झालं पाहिजे. काही लोकं प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत मात्र जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत.