बेळगाव : येत्या 5 फेब्रुवारीला बेळगावच्या विद्यमान महापौर आणि उपमहापौरांचा कार्यकाळ संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसच्या छावणीत राजकीय गणिते जोरात मांडली जात आहेत. 22व्या टर्मसाठी महापौरपद एससी महिला, उपमहापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. 58 सदस्यांपैकी 35 सदस्यांचे स्पष्ट बहुमत सत्ताधारी भाजपकडे आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपच्याच पारड्यात जणार हे स्पष्ट आहे. तरीही काँग्रेसने ऑपरेशन ‘हस्त’ राबवण्याचा विचार केल्यास त्यांचे स्वप्न पूर्ण होणे कठीण आहे. कारण महापौर पदासाठीचे आरक्षण असलेल्या एससी महिला प्रवर्गाचा उमेदवारच काँग्रेसकडे नाही. याउलट सत्ताधारी भाजपला या प्रवर्गाची काहीच समस्या नाही. कारण त्यांच्याकडे लक्ष्मी कांबळे आणि सविता राठोड या दोन एससी महिला सदस्य आहेत. या दोघींपैकी एकीला महापौरपद मिळणार हे निश्चित आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नगरसेविका बेळगाव उत्तर मतदारसंघातील प्रभागाचे प्रतिनिधित्व करत असल्याने यंदा बेळगावचे महापौरपद बेळगाव उत्तर मतदारसंघाला मिळणार. विद्यमान महापौर शोभा सोमनाचे या अनगोळमधून निवडून आल्या आहेत. त्यामुळे गेल्यावेळी बेळगाव दक्षिण मतदारसंघाला महापौरपद मिळाले होते.