बेळगाव : येणाऱ्या दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी आपण सर्व मराठीप्रेमी कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करणार आहोत. या दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या समग्र स्थितीगतीचा आढावा घेऊन तिच्या विकासाच्या दिशा निश्चित करण्यासाठी चर्चा आणि चिंतन आवश्यक आहे.
मराठी भाषेची सद्यःस्थिती, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यातील अडथळे, मराठी शाळांची रोडावत चाललेली संख्या, दृकश्राव्य माध्यमातील मराठीची दुरावस्था, मराठी वाचकांची कमी होणारी संख्या इ. इ. बरोबरच मराठीच्या उज्ज्वल भविष्यासाठी लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, ग्रंथपाल आदींची महत्त्वपूर्ण भूमिका आणि नवनवे प्रगतीचे मार्ग अशा विविध मुद्यांवर सर्वांगीण चर्चा करणे या दिवशी महत्त्वाचे आहे.
यासाठी दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता आपण सारे सार्वजनिक वाचनालयात एकत्र येऊन अनौपचारिक चर्चा करुया. आपण या विषयातले तज्ज्ञ आहात. म्हणून आपणास विनंती ही की, आपण आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन करावे, असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष गोविंदराव राऊत, उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड, कार्यवाह सौ. लता पाटील, सहकार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी केले आहे.